– शाखा प्रमुख ते शहर प्रमुख; विशाल कोरके यांचा प्रेरणादायी राजकीय प्रवास
– निष्ठा, संघटन कौशल्य आणि सामाजिक कार्याच्या बळावर नागपूर शहर प्रमुखपदाची जबाबदारी
नागपूर :- शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने, तसेच पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव आणि संपर्कप्रमुख संजय निरुपम यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल कोरके यांची शिवसेनेच्या नागपूर शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शाखा प्रमुख म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात करून शहर प्रमुखपदापर्यंत मजल मारणारा त्यांचा प्रवास शिवसैनिकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे. सामान्य शिवसैनिक म्हणून पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत विशाल कोरके यांनी टप्प्याटप्प्याने संघटनेत आपले स्थान निर्माण केले. शाखा प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच कार्यकर्त्यांचे संघटन, नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेशी नाते दृढ करण्यावर भर दिला. पक्षाप्रती असलेली निष्ठा, सातत्यपूर्ण कार्य आणि संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी आज शहर प्रमुखपदापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. राजकीय कार्यासोबतच सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातही विशाल कोरके नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, विविध क्रीडा स्पर्धा, शिव मॅरेथॉन, गणेशोत्सव, युवक मेळावे आदी विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यांनी युवकांना सामाजिक कार्याशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा नागरिकांशी सातत्याने संपर्क राहिला असून, समाजातील विविध घटकांमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहर प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना विशाल कोरके म्हणाले, “माझ्या शहर प्रमुखपदी झालेल्या निवडीबद्दल सर्वांनी दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण दाखविलेला विश्वास आणि दिलेले प्रेम हीच माझी पुढील वाटचालीसाठी प्रेरणाशक्ती आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण घराघरात पोहोचविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे आणि शिवसैनिकांना सोबत घेऊन पक्षाचा विस्तार करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट राहील.” या नियुक्तीबद्दल विशाल कोरके यांनी पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, संपर्कप्रमुख संजय निरुपम तसेच आमदार कृपाल तुमाने यांचे विशेष आभार मानले. शाखा प्रमुखापासून शहर प्रमुखपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा पक्षनिष्ठा, मेहनत आणि संघटनात्मक कार्याची पावती मानला जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे नागपूर शहरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.






