भंडारा :- क्रांतिसूर्य ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त तसेच १५ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘जनजातीय गौरव दिवसा’च्या पार्श्वभूमीवर, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने स्थानिक भाजपा जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरात ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत ‘जनजातीय गौरव सप्ताह’ साजरा केला जात आहे.
या परिषदेत पदाधिकाऱ्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदान आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीच्या संघर्षाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आदिवासी समाजाच्या सन्मान, शिक्षण, आरोग्य व सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा पाढा यावेळी वाचण्यात आला. तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांचे विचार घराघरांत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे, अज मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक उईके, जिल्हा महामंत्री मयूर बिसेन, शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, अक्षय भिवगडे, नरेश बोपचे आणि कुलदीप सुखदेवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.






