भंडारा :- स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडाकेबाज कामगिरी करत भंडारा जिल्हा व नागपूर शहर परिसरात घडलेल्या चोरी आणि घरफोडीच्या घटनांचा छडा लावून तीन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत शेषराज ठाकरे (वय २०) रा. बोथली , अनिल बोरकर (वय ४०) रा. साकोली, आणि राज दांडेकर (वय ३०) रा. गिरोला या तिघांकडून चोरीचे ५ व घरफोडीचे ४ असे एकूण ९ गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात आले.
आरोपींवर जवाहरनगर (अप.क्र. ४३८/२६), वरठी (अप.क्र. ४६८/२६), अड्याळ (अप.क्र. ४४/२६), साकोली (अप.क्र. ५७९/२६), हुडकेश्वर (अप.क्र. ८४४/२६), लाखनी (अप.क्र. ३९२/२६, ५३१/२६) तसेच भंडारा (अप.क्र. १२३१/२६, १२३८/२६) पोलीस ठाण्यांत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२), ३०५(१), ३०५(a), ३३१(२), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हे नोंद आहेत.
पोलिसांनी या कारवाईदरम्यान आरोपींच्या ताब्यातून ३ लाख ८९ हजार ६०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व लगड, ३३ हजार रुपयांची रोख रक्कम, २० हजार रुपयांची मोटारसायकल आणि १२,६०० रुपयांची केबल वायर असा एकूण ४ लाख ५६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही यशस्वी कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पूर्ण केली.






