spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन 

भंडारा :- क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा यांच्या वतीने १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जनजाती गौरव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांचे लाभ वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य तपासणी, शैक्षणिक व रोजगार मार्गदर्शनासह विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सप्ताहाच्या पहिल्या दिवशी १३ नोव्हेंबर रोजी न्यूक्लिअस बजेट योजना, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA-JGUA) आणि PM-JANMAN अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ व धनादेशांचे वितरण करण्यात येणार आहे. महिला बचत गटांना आर्थिक मदत देण्यासह स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, खापा खुर्द येथे इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या मुलींच्या पालकांना सुकन्या समृद्धी योजनेची माहिती देऊन नोंदणी करण्यात येणार आहे.

१४ नोव्हेंबर रोजी आदिवासी स्मारके, स्वातंत्र्यसैनिकांचे पुतळे व परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ऐतिहासिक आंबागड किल्ला येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी १५ नोव्हेंबर रोजी तुमसर येथे आदिवासी संस्कृतीविषयक रॅली काढण्यात येणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. यावेळी आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवकांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदिवासी युवक-युवती, खेळाडू, गुणवंत विद्यार्थी आणि कलावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे.

१६ नोव्हेंबर रोजी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड दुरुस्ती व विविध शासकीय कागदपत्रांसंदर्भात सेवा शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. वनपट्टेधारकांना विविध शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यासह डिजिटल माध्यमातून शासकीय अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

१७ नोव्हेंबर रोजी आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह व सिकलसेल आजाराची तपासणी, माता-बाल आरोग्य आणि पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणे व अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

१८ नोव्हेंबर रोजी आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिन साजरा करून सप्ताहाचा समारोप होईल. यावेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, जात वैधता प्रमाणपत्र आणि स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आयटीआय व कौशल्य विकास विभागामार्फत रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती देण्यात येईल. तसेच वनपट्टेधारकांना सातबारा व इतर आवश्यक दाखल्यांचे वाटप करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

आदिवासी समाजाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण करणे, शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे तसेच आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारसा यांचा गौरव करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी या सप्ताहात आयोजित विविध उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ यांनी केले आहे.

Popular Articles