सुकळी/नकुल :- तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत पिपरी/चुनी आणि सुकळी/नकुल येथील दोन कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीच्या आदेशाला कामगार न्यायालय, भंडारा यांनी स्थगिती दिली आहे. न्यायालयाने दोन्ही कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावर पूर्ववत कामावर रुजू करून घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
सुकळी/नकुल येथील शिपाई गणेश आंबेडारे आणि पिपरी/चुनी येथील शिपाई जयप्रकाश डोमळे यांना विविध आरोपांवरून सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. याविरोधात त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. सुनावणीदरम्यान न्यायाधीश आर. व्ही. डाफरे यांनी कोणतीही सविस्तर विभागीय चौकशी न करता आणि बाजू मांडण्याची संधी न देता केलेली कारवाई नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांविरोधात असल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणात कर्मचाऱ्यांच्या वतीने ॲड. विजय रेहपाडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. कामगार न्यायालयाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याची माहिती कामगार सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रामलाल बिसेन यांनी दिली.






