खापा वार्ताहर :- राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रिम मदत अद्याप अनेक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अंधारात गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात ही रक्कम खात्यात जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात विचारणा केली असता, अॅग्रीस्टॅक प्रणालीवर फार्मर आयडीची नोंदणी करण्यात आली असून, या मदतीसाठी तलाठी कार्यालयाकडून स्वतंत्र लाभार्थी यादी तयार करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. फार्मर आयडीची प्रक्रिया पूर्ण असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मात्र, डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) प्रणालीद्वारे संपूर्ण प्रक्रिया होत असल्याने रक्कम वितरणाबाबतची सविस्तर माहिती तलाठी कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
विशेष म्हणजे, सावनेर तालुक्यातील खापा महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या करजघाट गावातील जवळपास एकाही शेतकऱ्याला अद्याप दुष्काळी अग्रिम आर्थिक मदत मिळाली नसल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे आर्थिक गणित बिघडले आहे, तर दुसरीकडे सणासुदीच्या काळातही शासनाची मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
“मदत मिळाली नाही तर दाद मागायची कुणाकडे?”
शासनाकडून मदत जाहीर झाल्यानंतरही प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बँक खात्यात रक्कम जमा न झाल्यास त्याची विचारणा कोणत्या विभागाकडे करायची, तक्रार कुठे नोंदवायची आणि मदत मिळण्यास विलंब का होत आहे, याबाबत प्रशासनाने स्पष्ट मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
या प्रकरणाची शासन व प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी व तांत्रिक अडचणी तपासाव्यात. फार्मर आयडीसह इतर आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम मदतीची पाच हजार रुपयांची रक्कम जमा करावी, अशी मागणी शेतकरी सुभाष झाडे, कोठीराम झाडे, जिवन मुरकुटे, अनिल पाटील, सुरेश गाडीगोणे यांच्यासह करजघाट, गडेगाव, खापा, कोदेगाव, नंदापूर, वाकोडी, बडेगाव परिसरासह सावनेर तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.
घोषणा झाली, मात्र मदत कधी मिळणार? हा प्रश्न आजही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सतावत असून, शासनाने केवळ घोषणांपुरते न थांबता प्रत्यक्ष मदत पोहोचवावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.






