गडचिरोली :- कीटकजन्य आजारांच्या प्रभावी नियंत्रणासाठी आणि निर्मूलनासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वाकडी उपकेंद्र येथे आज मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी अत्याधुनिक ‘कीटकशास्त्रीय फील्ड लॅबोरेटरी’चे (Entomological Field Laboratory) उद्घाटन करण्यात आले. तसेच या निमित्ताने प्रकल्पाची सविस्तर माहिती देणाऱ्या फलकाचे व प्रकल्प आराखड्याचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
केंद्र शासनाच्या आरोग्य व संशोधन विभागाच्या अंतर्गत कीटकजन्य आजारांच्या निर्मूलनासाठी वेक्टर सर्व्हेलन्सकरिता ‘राष्ट्रीय एकात्मिक आण्विक झेनोमॉनिटरिंग राष्ट्रीय नेटवर्क’ (IMX-Net – Integrated Molecular Xenomonitoring National Network) हा महत्त्वपूर्ण प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात प्रस्थापित करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेली वाकडी उपकेंद्रातील ही प्रयोगशाळा जिल्ह्यातील हिवताप (मलेरिया), हत्तीरोग (फायलेरिया), डेंग्यू यांसारख्या कीटकजन्य आजारांचे अचूक निदान, डासांच्या प्रजातींचा अभ्यास आणि त्यांच्यातील जंतूंचे आण्विक स्तरावर निरीक्षण (झेनोमॉनिटरिंग) करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात कीटकजन्य आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रीय संशोधनाची जोड अत्यंत आवश्यक आहे. या प्रयोगशाळेमुळे स्थानिक पातळीवरच कीटकशास्त्रीय नमुन्यांची तपासणी वेगाने होणार असून, रोगप्रसार रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे शक्य होईल.
या उद्घाटन सोहळ्यास खालील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते:
डॉ. प्रताप शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली)
डॉ. मंजू राही (संचालक व शास्त्रज्ञ ‘जी’, आयसीएमआर – एनआयव्हीसीआर, पॉंडिचेरी)
डॉ. विशाल डोग्रा (कार्यक्रम अधिकारी – एनटीडी, गेट्स फाउंडेशन, इंडिया)
डॉ. ए. एन. श्रीराम (शास्त्रज्ञ ‘ई’, आयसीएमआर – एनआयव्हीसीआर, पॉंडिचेरी)
डॉ. लक्ष्मण कानेकर (कीटकशास्त्रज्ञ, टीसीआय फाऊंडेशन)
डॉ. प्रफुल्ल गोरे (सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली)
राजेश कार्लेकर (जिल्हा व्हीबीडी सल्लागार, गडचिरोली)
या कार्यक्रमास वाकडी उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, स्थानिक आरोग्य सेवक तसेच राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे (NVBDCP) प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्हा कीटकजन्य रोगमुक्त करण्याच्या मोहिमेला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास आरोग्य विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.






