spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाईवर मात करण्यासाठी गाळपेरा क्षेत्रात चारा पिकांची लागवड करावी 

हंसराज, भंडारा :- खरीप हंगाम २०२६ मध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जलसंपदा तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील गाळपेरा क्षेत्र चारा पिकांच्या लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये भंडारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश आहे. पावसाच्या कमतरतेमुळे भविष्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने ही उपाययोजना हाती घेतली आहे. गाळपेरा क्षेत्राचा उपयोग केवळ चारा पिकांच्या लागवडीसाठी करण्यात येणार असल्याने चारा उत्पादन वाढविण्यास मदत होणार आहे.

शेतकरी व पशुपालकांसाठी संधी

या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि पशुपालकांना चारा उत्पादनासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध होणार आहे. जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविणे, चारा टंचाईवर मात करणे तसेच चारा उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देणे,

भंडारा जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी व पशुपालकांनी शासनाच्या या निर्णयाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि उपलब्ध गाळपेरा क्षेत्रात चारा पिकांची लागवड करून चारा उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

अर्जासाठी संबंधित कार्यालयांशी संपर्क साधावा

या योजनेची सविस्तर माहिती, अटी व शर्ती तसेच विहित नमुन्यातील अर्ज मिळविण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय,डॉ. विलास गाडगे यांनी केले आहे.

Popular Articles