– पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी सुचविलेल्या विकासकामांना मंजुरी
– प्रत्येक नगरपंचायतीला प्रत्येकी २ कोटी रुपये
यवतमाळ :- जिल्ह्यातील नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांना गती देण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सहा नगरपंचायतींना एकूण १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी सुचविलेल्या विकासकामांना उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून, यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
या निधीतून कळंब, बाभुळगाव, मारेगाव, महागाव, राळेगाव आणि झरीजामणी या सहा नगरपंचायतींमधील विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. प्रत्येक नगरपंचायतीला प्रत्येकी २ कोटी रुपये याप्रमाणे एकूण १२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या निधीच्या माध्यमातून नगरपंचायत क्षेत्रातील विविध प्रभागांमधील आवश्यक विकासकामे मार्गी लागणार असून, स्थानिक पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार आहे. मंजूर निधीतून होणाऱ्या कामांची अंमलबजावणी संबंधित नगरपंचायतीमार्फत करण्यात येणार आहे.
पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी जिल्ह्यातील नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, शासनाच्या या निर्णयामुळे सहाही नगरपंचायतींच्या विकासाला गती मिळणार आहे.






