हंसराज, भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भूजल स्रोतांचे संरक्षण व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर लागू करण्यात आलेले निर्बंध शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कामांसाठी १५ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांची शेतीविषयक कामे, पिकांचे संवर्धन, सिंचनाची आवश्यकता तसेच अन्य कृषीविषयक कामांची निकड विचारात घेता, जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या आदेशान्वये लागू असलेली विशेष परवानगी घेण्याची अट आता शेतीविषयक कामांसाठी लागू राहणार नाही.
मात्र, ही सवलत काही अटींच्या अधीन राहील. महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील कलम २१ नुसार सार्वजनिक पिण्याच्या उद्भवापासून (विहीर/विधन विहीर) ५०० मीटरच्या अंतरादरम्यान कोणत्याही प्रयोजनासाठी खाजगी विहीर किंवा विधन विहीर खोदकाम करता येणार नाही. तसेच नळ पाणी पुरवठा उद्भवाजवळ (५०० मीटर अंतरापर्यंत) असलेल्या खाजगी विहीरीत इनवेल किंवा आडवे बोअर घेता येणार नाही.
कोणत्याही परिस्थितीत ६० मीटरपेक्षा जास्त खोलीची विधन विहीर किंवा कुपनलिका घेता येणार नाही. तसे आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ मधील तरतुदींनुसार कार्यवाही करण्यात येईल. भूजल अधिनियमातील सर्व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
सदर सवलत केवळ शेतीविषयक कामांसाठीच लागू राहील. इतर कारणांसाठी बोअरवेल खोदकामावरील पूर्वीचे निर्बंध कायम राहतील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






