spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रेल्वे रुळांवर भटकणाऱ्या सहा मुलींची पोलिसांनी केली सुटका

– चंद्रपूरच्या सुधारगृहातून निघाल्या होत्या; हिंगणघाट पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला संभाव्य अनर्थ

वर्धा :- चंद्रपूर येथील सुधारगृहातून निघून गेलेल्या सहा मुलींना हिंगणघाट पोलिसांनी शोधून सुखरूप ताब्यात घेतले. रेल्वे रुळांवरून पायी जात असताना गुन्हे शोध पथकाच्या (डीबी) पोलिसांच्या नजरेस त्या पडल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य दुर्घटना टळली. या कारवाईत पोलिस अंमलदार राजेश शेंडे यांनी दाखवलेले प्रसंगावधान महत्त्वपूर्ण ठरले.

अधिकाऱ्यांशी वादानंतर सुधारगृहातून बाहेर

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील सुधारगृहातील संबंधित अधिकाऱ्यांशी वाद झाल्यानंतर सहा मुली तेथून निघून गेल्या होत्या. त्या रेल्वेने नागपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती चंद्रपूर पोलिसांनी वर्धा जिल्हा पोलिस प्रशासनाला दिली. यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी हिंगणघाटचे ठाणेदार अनिल राऊत यांना तातडीने शोधमोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या.

रेल्वे रुळांवर दिसताच पाठलाग

सूचनेनुसार हिंगणघाट पोलिसांनी रेल्वे स्थानक आणि परिसरात शोध सुरू केला. दरम्यान, डीबी पथकातील पोलिस अंमलदार राजेश शेंडे यांना रेल्वे रुळांवरून काही मुली पायी जात असल्याचे दिसले. रेल्वे रुळांवरून चालणे धोकादायक असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ मुलींचा पाठलाग केला. प्रसंगावधान राखत त्यांनी सहाही मुलींना सुरक्षित ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात आणले.

चंद्रपूर पोलिसांच्या स्वाधीन

घटनेची माहिती तातडीने चंद्रपूर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर चंद्रपूर येथील रामनगर पोलिस ठाण्याचे पथक हिंगणघाट येथे दाखल झाले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सहाही मुलींना सुखरूप चंद्रपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. हिंगणघाट पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळल्याने पोलिस अंमलदार राजेश शेंडे यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

Popular Articles