– १५ वर्षांखालील मुलांसह १२ वर्षांवरील मुलींना संधी; निवड चाचणी पूर्णपणे निःशुल्क
यवतमाळ :- विदर्भ क्रिकेट संघटना, नागपूर यांच्या वतीने विदर्भातील शहरी तसेच ग्रामीण भागातील उदयोन्मुख शालेय क्रिकेटपटूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हानिहाय निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील १५ वर्षांखालील शालेय मुले आणि १२ वर्षांवरील मुलींसाठी सोमवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२६ रोजी निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.
सदर निवड चाचणी सकाळी ९ वाजता पार्थ स्पोर्ट्स अकॅडमी, घुई, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ येथे पार पडणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी नागपूर येथून विदर्भ क्रिकेट संघटनेच्या निवड समितीचे सदस्य उपस्थित राहणार असून, जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना आपले क्रिकेट कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे या निवड चाचणीसाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
या निवड चाचणीसाठी १ सप्टेंबर २०११ नंतर व ३१ ऑगस्ट २०१३ पूर्वी जन्मलेले १५ वर्षांखालील मुले तसेच १ सप्टेंबर २०१४ पूर्वी जन्मलेल्या मुली पात्र असतील.
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपल्या शाळेतील इच्छुक खेळाडूंची यादी शाळेच्या लेटरहेडवर तयार करून द्यावी. यादीमध्ये खेळाडूंचे नाव, जन्मतारीख, क्रीडा शिक्षकाचे नाव व मोबाईल क्रमांक नमूद करावा. त्यासोबत बोनाफाईड प्रमाणपत्र जोडून दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत संबंधित संपर्क व्यक्तींकडे अर्ज जमा करावेत. अंतिम तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
निवड चाचणीसाठी खेळाडूंनी बोनाफाईड प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्ड ही कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच सर्व खेळाडूंनी स्वतःचे क्रिकेट साहित्य आणि पांढरा क्रिकेट पोशाख परिधान करून ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता मैदानावर उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी रोहित चव्हाण, पुसद (९०२२८४१७३२ / ९१५७६४८८८५), अक्षय कडू , पांढरकवडा (८८०५६४९४५८) आणि क्रांती अलोने, यवतमाळ (७३५०५०६९०८) यांच्याशी संपर्क साधावा.
ग्रामीण व शहरी भागातील शालेय क्रिकेटपटूंना विदर्भ क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची ही महत्त्वपूर्ण संधी असून, जिल्ह्यातील सर्व शाळा, क्रीडा शिक्षक, पालक आणि इच्छुक खेळाडूंनी या निवड चाचणीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन व्हीसीएचे यवतमाळ जिल्हा संयोजक बाळू नवघरे यांनी केले आहे.






