spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नाबार्डच्या अधिकाऱ्यांकडून मौदा तालुक्यातील चाचेर येथील मौदा ईसाफ फाउंडेशन समर्थित शेतकरी उत्पादक कंपनीची पाहणी

किशोर साहू, मौदा :- नाबार्ड (NABARD), प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्या वतीने गुरुवार (ता.१९ नोव्हेंबर २०२६) रोजी नागपूर जिल्ह्यातील ईएसएएफ (ESAF) फाउंडेशनमार्फत कार्यरत शेतकरी उत्पादक कंपन्यांचा निरीक्षण व तपासणी दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यांतर्गत मौदा तालुक्यातील चाचेर येथील मौदा फसल फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड शेतकरी उत्पादक कंपन्यांची पाहणी करण्यात आली.

या दौऱ्यात ईसाफ फाउंडेशनचे महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्य प्रमुख मनिष मानकर, ईसाफ कृषी क्षेत्र उपक्रम विभागाचे विभागीय प्रमुख एम. एम. कुमार आणि नाबार्ड, प्रादेशिक कार्यालय, पुणे येथील कृषी क्षेत्र विकास विभागाचे एफपीओ प्रकल्प सहयोगी प्रमोद जाधव उपस्थित होते.

मौदा फसल एफपीओ चे अध्यक्ष लक्ष्मीकांत चाफले व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सोमनाथे , संचालक मेघश्याम कुल्लरकर , कृष्णा चाफले, लता गिरडकर, रेखा चौरे, सह सभासद शेतकरी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालक मंडळातील सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापन पथकाशी संवाद साधण्यात आला. कंपनीच्या संस्थात्मक विकासाचा आढावा, व्यवसायवृद्धी, शेतकरी सभासद नोंदणी, भागभांडवल संकलन, विविध व्यावसायिक उपक्रम तसेच कंपनीच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजाची माहिती घेण्यात आली.तसेच कंपनीच्या आवश्यक नोंदवह्या, आर्थिक व्यवहारांच्या नोंदी, लेखापरीक्षण, वैधानिक अनुपालन आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आतापर्यंत केलेली प्रगती, व्यवसायवृद्धीतील अडचणी आणि भविष्यातील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अधिक सक्षमपणे कार्यरत राहून शेतमालाचे एकत्रीकरण, कृषी निविष्ठा व विपणन सुविधा, बाजारपेठेशी जोडणी आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून काम करण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या निरीक्षण व तपासणी दौऱ्याचा मुख्य उद्देश शेतकरी उत्पादक कंपन्यांची संस्थात्मक क्षमता वाढविणे, कामकाजात पारदर्शकता आणणे, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सुनिश्चित करणे आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या शाश्वत व्यवसायवृद्धीस चालना देणे हा होता.

Popular Articles