Home Latest News “पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांची मा मारबत मार्गांचा आढावा घेतला

“पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांची मा मारबत मार्गांचा आढावा घेतला

0
43

 

नागपूर २२ – नागपूरमधील मारबत उत्सव हा पोळ्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी (तान्हा पोळा) साजरा होणारा पारंपरिक व सांस्कृतिक वारसा जपणारा सोहळा आहे. या दिवशी काळी, पिवळी आणि अलीकडच्या काळात लाल रंगांच्या भव्य मारबतांची शहरातून मिरवणूक काढली जाते. साधारण १८ ते २० फूट उंच पिवळी मारबत आणि १४ फूट उंच काळी मारबत ऐतिहासिक भागातून ६.५ किलोमीटरच्या मार्गावरून नेली जाते. या मिरवणुकीत ढोल-ताशे, नृत्य, घोषणांचा जल्लोष असतो. मारबतांसोबतच्या बडग्या नावाच्या छोट्या मूर्ती समाजातील वाईट प्रवृत्ती, अन्याय व त्या काळातील सामाजिक समस्यांचे प्रतीक म्हणून मिरवणुकीत सामील होतात. शेवटी पिवळी मारबत नाईक तलावाजवळ आणि काळी मारबत हरीहर मंदिराजवळ नेऊन जाळली जाते. या प्रतीकात्मक घटनेतून दुष्ट प्रवृत्तीवर चांगुलपणाचा विजय दर्शविला जातो.

आगामी मारबत मिरवणुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी २१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता काळी, पिवळी आणि लाल मारबत मार्गांची पाहणी केली. बंदोबस्त पाहणीदरम्यान डॉ. सिंगल म्हणाले की, “मारबत हा नागपूरच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. या उत्सवात हजारो नागरिक सहभागी होतात, त्यामुळे सुरक्षा, वाहतूक आणि नागरिकांच्या सोयीसुविधा हे आमचे प्राधान्य आहे. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळी आढावा घेतला आहे. अरुंद मार्ग लक्षात घेऊन विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी ॲम्बुलन्सची सोय, मीडिया प्रतिनिधींसाठी जागा, आयोजक आणि स्वयंसेवकांसोबत समन्वय, तसेच एंट्री आणि एग्झिट पॉइंट्सचे नियोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीच्या वेळी इतर कोणतीही वाहने मार्गात येऊ नयेत याची काळजी घेतली जाणार आहे. पार्किंगची ठिकाणे निश्चित केली असून नागरिकांना परतताना अडचण येऊ नये याचीही दक्षता घेतली जाईल.”

सुमारे ३,००० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार असून ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या सहाय्याने संपूर्ण मार्गावर सतत लक्ष ठेवले जाईल. लकडगंज, पाचपावली, तहसील आणि कोतवाली या भागांतून मिरवणूक जाणार असल्याने या परिसरात कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी नागपूरकरांना आवाहन केले की, “मारबत हा आपला सांस्कृतिक उत्सव आहे. तो शांततेत, आनंदात आणि सुरक्षिततेत पार पडावा यासाठी पोलिसांकडून संपूर्ण बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून उत्सव यशस्वी करण्यासाठी मदत करावी.”