spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शासकीय निधीच्या अपव्यवहार प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व बसपाच्या नगरसेविकेविरुद्ध गुन्हा दाखल 

कामठी :- कामठी नगर परिषदेत २०२१ मध्ये विकासकामांच्या नावाखाली शासकीय निधीचा अपव्यवहार केल्याच्या आरोपावरून तत्कालीन मुख्याधिकारी, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व बसपाच्या नगरसेविकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा जुन्या कामठी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम १२०(बी), १६६, १९२, २०१, २१२, २१८, ४०९, ४६८ व ४७१ अन्वये नोंदविण्यात आला आहे.

या संदर्भात फिर्यादी काँग्रेसचेच नरेंद्र राधेश्याम शर्मा यांनी २०२१ मध्येच पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल्यानंतर अखेर शनिवारी पोलिसांनी कारवाई केली.

फिर्यादीने केलेल्या तक्रारीनुसार, नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १, ३, ४, ५, ७, ८, १०, ११, १२, १३, १४ आणि १६ मध्ये सिमेंट रस्ता, सिमेंट नाली, एच.पी. नाली, नाल्याचे कव्हर, पेव्हिंग ब्लॉक, कल्व्हर्ट व फ्लोरिंग आदी विकासकामे कागदोपत्री पूर्ण दाखवण्यात आली. प्रत्यक्षात मात्र कामे अर्धवटच राहिली असून संपूर्ण रकमेची उचल मे पारस इंटरप्रायजेस या कंत्राटदाराकडून करण्यात आली. ही फर्म तत्कालीन काँग्रेसचे नगराध्यक्ष मोहम्मद शाहजहाँ यांच्या मालकीची असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

तत्कालीन काळात संदीप बोरकर हे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे अहफाज अहमद अब्दुल शकूर होते. या प्रकरणात बहुजन समाज पक्षाच्या नगरसेविका रमा नागसेन गजभिये यांचाही सहभाग असल्याचे गुन्हा नोंदविल्यानंतर स्पष्ट झाले आहे.

कामठी नगर परिषदेच्या मागील दीड दशकातील राजकारणात तथाकथित गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा हस्तक्षेप वाढल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे भाई म्हणून ओळखले जाणारे माजी नगराध्यक्ष मो. शाहजहाँ आणि भाजपचे भाऊ रंजीत सफेलकर यांच्या प्रभावामुळे नगर परिषदेकडील अनेक कंत्राटी कामांवर त्यांच्या निकटवर्तीयांचा वर्चस्व राहिले आहे.

मो. शाहजहाँ यांच्यावर नगराध्यक्ष होण्यापूर्वीच मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे, तर रंजीत सफेलकर हे एका खुनाच्या प्रकरणात सध्या मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर कामठी नगर परिषदेत झालेल्या निधी अपव्यवहार प्रकरणी नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.