महिलांनी घेतला पारंपरिक नृत्याचा आनंद
पांढरकवडा :- केळापूर तालुक्यातील पांढरकवडा शहर हे तेलंगणा राज्याच्या सीमेवर असल्याने पूर्वीपासूनच तेलंगणातील अनेक सण, उत्सव या शहरात साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्याची पारंपरिक संस्कृतीचे प्रदर्शन विविध सणांच्या माध्यमातून दिसून येते. यात हा बतुकम्मा सण सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बतुकम्मा सण हा एक सार्वजनिक उत्सवा प्रमाणे साजरा केला जावा हा हेतू मनात घेऊन विदर्भ बेलदार व तत्सम समाज संघटना शाखा पांढरकवडा यांच्या पुढाकारांने परिसरातील महिलांसाठी बतुकम्मा सण साजरा करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी एक मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले. यावर्षीचा सार्वजनिक बतुकम्मा उत्सवाचे हे तिसरे वर्ष होते. बेलदार, मुन्नुरकापू, तेलंगणा, तेलंगी समाजाचा सांस्कृतिक आणि पारंपरिक असा बतुकम्मा सण पांढरकवडा शहरात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमात आमदार राजू तोडसाम सपत्नीक उपस्थित होते. सार्वजनिक बतकम्मा महोत्सवाच्या निमित्ताने गावातील माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. नैसर्गिक फुलांच्या माध्यमातून साकारलेल्या रंगीबेरंगी बतुकम्मांनी संपूर्ण परिसर सुगंधित झाला होता. महिलांनी बतुकम्मा च्या सभोवती वर्तुळाकार आकारात पारंपरिक नृत्य केले व नृत्यातून माझ्या शहराला धनधान्याने समृद्ध ठेव अशी मागणी गौरी रुपातील देवीकडे केली. हा उत्सव दि. ११ ऑक्टोंबर रोजी शिक्षक काॕलोनी येथून महादेव घाट च्या विसर्जन स्थळी वाजत गाजत, पारंपारिक गीतावर फेर धरून नृत्य करत समाजातील शेकडो महिला बतुकम्मा घेऊन नदीकडे निघाल्या. नदीत बतुकम्मा सोडून परतायला लागले तेव्हा त्यांचे काजळमाखले माशासारखे डोळे पाणावलेले होते. कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे, देणगीदारांचे, विशेष देणगीदारांचे, ठीकठीकाणी पाणी, दुध व फळे उपलब्ध करून दिल्याबद्दल शहरातील प्रसिद्ध निरज मोबाईल शाॅप’ व खेतानी फाॅंडेशन आयोजकांचे मनोबल वाढविणाऱ्या समाज बांधवांचे, विसर्जन स्थळी प्रकाश व्यवस्था करून दिल्याबद्दल न.प. पांढरकवडा तसेच वाहतूक विभाग पांढरकवडा पोलिस स्टेशन आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आयोजकातर्फे आभार व्यक्त करण्यात आले. सदरील बतुकम्मा उत्सव यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा दिपाली पद्लमवार, शहराध्यक्षा जयश्री बंतपेल्लीवार, रामेश्वरी वल्लमवार, ललिता गडपेल्लीवार, वंदना वद्येवार, शुभांगी गांगुलवार, राधिका देशट्टीवार, छायादेवी मुत्यालवार, रजूना अनमुलवार, लावण्या पार्लावार, कल्याणी नेल्लावार, सपना मदीकुंटावार, काजल संकुरवार, अनिता कोटेवार, जयश्री चिट्टलवार, अर्चना पडलवार, व शेकडो महिलांनी अथक परिश्रम घेतले.




