– शिक्षकांच्या या अभिनव उपक्रमाचे बोरगाव परिसरात सर्वत्र कौतुक
हंसराज,भंडारा मानेगाव (बाजार) / बोरगाव :- विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद केवळ शाळेच्या भिंतींच्या आत मर्यादित न ठेवता, तो थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा एक आगळावेगळा उपक्रम भंडारा तालुक्यातील बोरगाव येथील मारोतराव कावळे विद्यालयाने राबविला. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल शिक्षकांनी त्यांच्या घरी जाऊन आई-वडिलांच्या उपस्थितीत त्यांचा यथोचित गौरव केला. शाळेच्या या अभिनव उपक्रमामुळे गावात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कावळे आणि मुख्याध्यापक दुर्योधन हटवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि शिक्षकांच्या अचूक मार्गदर्शनामुळेच हे शिखर गाठले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
गुणवंतांचा गौरव या विशेष सत्कार सोहळ्यात शाळेतून प्रथम क्रमांक पटकावणारी स्नेहल लांजेवार आणि द्वितीय क्रमांक प्राप्त करणारी रोशनी सार्वे यांचा त्यांच्या पालकांसमवेत विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांइतकाच पालकांचाही मोठा वाटा असल्याचे सांगत विद्यालयाच्या वतीने पालकांचेही आभार मानण्यात आले.
या प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक ठाकरे, शिक्षक भारत कांबडी, संजय रेहपाडे, महेंद्र खंडाईत, रामचंद्र बडवाईक, संदीप जाधव, बाळकृष्ण वाडीभस्मे, विजय मेश्राम, दिलीप ढगे, चतुराम लांजेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पालकवर्गातून राजू सार्वे, प्रमोद लांजेवार, भारतीय सैनिक राकेश सातपैसे, विनायक लांजेवार, सुखराम धनिशकर, ज्ञानेश्वर निकुळे यांच्यासह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अधिक गोडी निर्माण होईल आणि इतर विद्यार्थ्यांनाही यातून प्रेरणा मिळेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. शाळेच्या या संवेदनशील आणि कौतुकास्पद निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.