कामठी :- महिलांच्या आरोग्य सेवेला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, कामठी येथील आशा हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक मॅमोग्राफी सेंटरचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आता स्तन कर्करोगाच्या तपासणीसाठी अत्याधुनिक सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाच्या प्रमुख उद्घाटक म्हणून जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योती चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कामठी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अजय अग्रवाल, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉ. प्रीती मानमोडे, तसेच आशा हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र अग्रवाल व डॉ. सौरभ अग्रवाल यांची उपस्थिती लाभली.
याप्रसंगी अलका अग्रवाल, डॉ. वेदिका अग्रवाल, अंकित अग्रवाल, मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय गडे, डॉ. पवन वाघ, लाला खंडेलवाल, मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. अमित देशराज, जयहरीसिंग ठाकूर आणि डॉ. अमीर झावेरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ. राजेंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, आशा हॉस्पिटल गेल्या ४० वर्षांपासून ग्रामीण भागात प्रामाणिक रुग्णसेवा देत आहे. कामठीतील महिलांना महागड्या तपासणीसाठी आता नागपूरला जाण्याची गरज भासू नये, या उद्देशाने हे सेंटर सुरू करण्यात आले आहे.”
ज्योती बावनकुळे म्हणाल्या, “ग्रामीण भागातील महिलांसाठी ही काळाची गरज होती. आशा हॉस्पिटलचा हा उपक्रम महिलांच्या आरोग्य रक्षणासाठी मैलाचा दगड ठरेल.”
डॉ. प्रीती मानमोडे यांनी आपले विचार मांडताना सांगितले, “संस्थेची सेवाभावी वृत्ती कौतुकास्पद आहे. जास्तीत जास्त महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.”
नगराध्यक्ष अजय अग्रवाल म्हणाले, “नारीशक्ती सशक्त असेल तरच कुटुंब आणि देश सुदृढ राहील. हे केंद्र महिला सशक्तीकरणाच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र गणवीर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयहरीसिंग ठाकूर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशा हॉस्पिटल व आसाराम नर्सिंग कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.








