– गुरुवार पेठेत मध्यरात्री आगीचा थरार
पुणे :- पुण्यातील गुरुवार पेठ परिसरात दिवाळीच्या फटाक्यामुळे जुन्या भंडारी वाड्याला आग लागल्याची घटना घडली. १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या आगीत दुमजली जुन्या वाड्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार पेठेतील भंडारी वाड्याच्या वरच्या मजल्यावर अचानक आग लागली. पेटता फटाका वाड्यात पडल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आगीमुळे जुन्या वाड्याचे पूर्ण नुकसान झाले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, फटाक्यांमुळे जुन्या इमारती आणि वाड्यांना आग लागण्याचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. नागरिकांनी फटाके फोडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरते.i






