खापा, वार्ताहर :- खापा पोलिस स्टेशन हद्दीतील खैरी पंजाबराव गावात रविवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा विजेचा जबर धक्का लागल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खडबड उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, खैरी पंजाबराव गावातील रहिवासी सीताराम कोठीराम पिपरेवार (वय ३९) हा सावनेर येथील एका खाजगी किराणा दुकानात काम करत होते. रविवारी सुट्टी असल्याने तो घरी होते. दरम्यान, सायंकाळी त्यांच्या घरात वीज गेली. सीताराम वीज मीटरजवळील बिघाड शोधत असताना त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यामुळे तो खाली पडला.
माहिती मिळताच खापा पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा तयार केल्यानंतर, सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेतून त्याला सावनेर येथील सावनेर शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी सीतारामला मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. खापा पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात जमादार प्रकाश नांदुरकर करत आहेत.
“निराधार कुटुंब, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत अनुदान मिळावे”
मृत सीताराम याच्या कुटुंबात आई , पत्नी आणि तीन मुली आहेत. त्याच्या अवकाळी मृत्यूमुळे कुटुंब निराधार झाले आहे. तो घरचा कर्ता असल्याने कुटुंबावर संकटाचे सावट आले आहे. मुलींच्या शिक्षणासाठी आणि संगोपनासाठी प्रशासनाने स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत अनुदान द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड व सरपंच सचिन गजभिये यांनी मागणी प्रशासनाला केली.








