– १५० स्पर्धकांनी ३० विविध प्रकारचे मॉडेल सादर
सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- कविकुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (किट्स), रामटेक येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने १० मार्च रोजी ‘आविष्कार २०२६’ मॉडेल मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सिव्हिल इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अंतर्गत आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या स्पर्धेत सुमारे १५० स्पर्धकांनी ३० विविध प्रकारचे मॉडेल सादर केले. स्पर्धेचे उद्घाटन वोडीथला एज्युकेशन सोसायटी, हैदराबादचे सचिव व्ही. श्रीनिवास राव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे होते. यावेळी सिव्हिल विभागप्रमुख डॉ. अनंत दाभाडे, विद्यार्थी डीन डॉ. पंकज आस्टनकर, असोसिएशन प्रमुख प्रा. विवेक कुंभारे, विद्यार्थी प्रतिनिधी अनुज साखरे तसेच विविध विभागाचे डिन, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना सचिव व्ही. श्रीनिवास राव यांनी सांगितले की, भारतात रस्ते, पूल, इमारती आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रात संशोधनाची मोठी गरज आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन, नवकल्पना आणि तांत्रिक कौशल्यात प्रगती करावी. अशा प्रकारच्या प्रदर्शनांचे नियमित आयोजन करणे आवश्यक आहे. प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी विद्यार्थ्यांनी संकल्पनांवर आधारित मॉडेल प्रत्यक्षात उतरवून समाजाला स्वस्त व उपयुक्त सेवा द्याव्यात असे आवाहन केले. विभागप्रमुख डॉ. अनंत दाभाडे यांनी विद्यार्थ्यांनी ‘वेस्ट मधून बेस्ट’ ही संकल्पना प्रभावीपणे साकारल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन श्लेषा गजघाटे, लक्ष्मी आजनकर, देलिया चौधरी व प्रियांशू बिसन यांनी केले. तर प्रस्तावना व आभार प्रदर्शन प्रा. विवेक कुंभारे यांनी केले.




