spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई होणार

– पालकमंत्री ना. संजय राठोड यांचा इशारा; पीडितांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन

यवतमाळ :- जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीशी शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकरी, महिला कर्जदारांकडून जोरजबरदस्तीने किंवा दबाव टाकून कर्जाची वसुली करू नये. अशा प्रकारे वसुली करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे गुरुवारी दि.१२ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी काही ठिकाणी शेतकरी, महिला इ. कर्जदारांवर दबाव आणला जात असल्याच्या घटना समोर आल्या. दुष्काळामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या वसुलीचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी शासनाने गंभीर भूमिका घेतली आहे. या विषयावर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कर्जवसुली थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

दुष्काळी परिस्थितीचा विचार करता कर्जदारांना दिलासा देणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही मायक्रो फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी कर्जवसुलीसाठी धमकी, दबाव किंवा बळाचा वापर करू नये. अशा प्रकारच्या घटना घडल्यास संबंधितांनी घाबरून न जाता थेट जिल्हा प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी. प्राप्त तक्रारींची गंभीर दखल घेऊन संबंधित कंपन्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी गुन्हा दाखल करण्याचा निर्देश शासनाने दिले आहेत. असेही ना. राठोड यांनी स्पष्ट केले.

Popular Articles