किशोर साहू,मौदा :- मौदा तालुक्यातील व नागपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कोदामेंढी येथील मंडई उत्सवाला उद्या शनिवार (ता.१४ नोव्हेंबर) पासून थाटात सुरुवात होणार आहे. मागील अनेक वर्षापासून या मंडई उत्सवाला तालुका व जिल्ह्यातील नागरिकांचा प्रतिसाद पाहता या मंडई उत्सवाचे नाव आता मंडई ‘मेला’ उत्सव झालेले आहे. दिवाळी संपली की तालुका व जिल्ह्यातील गावा – गावांमध्ये मंडई उत्सवाला सुरुवात होते. दिवाळी संपताच ‘कब है कोदामेंढी का मंडई ‘मेला’ उत्सव?’असे तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिक एकमेकांना विचारपूस करून कोदामेंढी गावातील मंडई ‘मेला’ उत्सवाचे आकर्षण वाढवत असतात.
या मंडई ‘मेला’ उत्सवानिमित्त आज शनिवार (ता.१४ नोव्हेंबर)ला सायं. १० वाजता आदर्श नाट्य मंडळातर्फे वार्ड क्रं. २ येथील आदर्श चौकात नागपूर येथील रोहन डान्स ग्रुप यांच्या रेकॉर्डिंग डान्स, तर राष्ट्रीय नाट्य मंडळातर्फे वार्ड क्र.४ येथील बाजार चौकात नागपूर येथील यादगार डान्स ग्रुप यांच्या कार्यक्रम होणार आहे.
रविवार (ता. १५ नोव्हेंबर)ला सकाळी १० वाजता पासून ते सायंकाळपर्यंत आदर्श नाट्य मंडळातर्फे शाहीर ज्ञानेश्वर, किशोर नक्कलकार, छोटू मास्तर ,डान्सर धीरज आणि मोंटी तथा सर्व संचाने सुसज्जित नवयुवक कलंगी पार्टी दुधाळा शाखा जयताळा यांच्या तमाशा, तर राष्ट्रीय नाट्य मंडळातर्फे शाहीर अंबादास नागदेवे व शाहीर आर्यन यांच्या राष्ट्रीय खडा तमाशा तसेच वार्ड क्रमांक १ मधील बस स्थानक चौकात तर वार्ड क्रमांक ३ येथील ग्रामपंचायत चौकातही विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. गावातील चारही वार्डात विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याने संपूर्ण गावात दिवस-रात्र रेलचेल असते व संपूर्ण गावातील मुख्य रस्ते दोन्ही बाजूने विविध प्रकारच्या दुकानाने सजलेले असतात. त्यामुळे या मंडई उत्सवाला मंडई ‘मेला’ उत्सवाचे स्वरूप आलेले आहे.
याप्रसंगी गावातील, परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून या मंडई ‘मेला’ उत्सवाच्या यशस्वीतेसाठी आदर्श नाट्य मंडळ , राष्ट्रीय नाट्य मंडळ, बस स्थानक चौकातील मंडळ व ग्रामपंचायत चौकातील मंडळाचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत असून गावातील सर्व व्यापारीवर्ग व ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत.






