spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी ‘एआय’ यंत्रणा पेंच परिसरात कार्यान्वित

– १५ एप्रिलपर्यंत ४० ठिकाणांचे अलर्ट्स मिळणार

नागपूर :- वनक्षेत्राजवळील गावांमध्ये वाघ किंवा बिबट्यांचा वावर आढळून आल्यास ग्रामस्थ आणि वन विभागाला सतर्कतेचा इशारा देणारी एआय आधारित यंत्रणा नागपूर ग्रामीण भागात तीन ठिकाणी कार्यान्वित झाली असून संबंधित परिसरात वाघ किंवा बिबट्यांचा वावर असल्याचे इशारे देखील मिळू लागले आहेत.

या यंत्रणेकडून मिळालेल्या इशाऱ्यानुसार गुरुवारी रात्रीच्या सुमारास देवलापारजवळील पिपरिया येथे दुसऱ्यांदा वाघाचा वावर असल्याचा इशारा गावकऱ्यांना आणि वन विभागाला मिळाला. विशेष म्हणजे येत्या १५ एप्रिलपर्यंत वनविभागाचे वन्यजीव क्षेत्र तसेच प्रादेशिक क्षेत्र मिळून संवेदनशील स्वरुपाच्या ४० गावांमध्ये ही यंत्रणा स्थापित करण्यात येत आहे.

नागपूर ग्रामीण भागात मागील अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीत वाघ किंवा बिबट्याच्या हल्ल्यात गावकऱ्यांचा मृत्यू होण्याच्या १५ घटना घडल्या आहेत. यापैकी अनेक घटनांमध्ये गावकऱयांमध्ये रोष निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून वन विभाग आणि नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘एआय’ आधारित (कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित) उपाययोजना सुरु केल्या आहेत.

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात योगदान देणाऱ्या मार्व्हल या संस्थेच्या वतीने ‘एआय’ आधारित यंत्रणा उभारण्यात येत आहे. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार हे मार्व्हल संस्थेचे सीईओ देखील आहेत. पोलिस अधीक्षक पोद्दार यांनी सांगितले की, मागील दोन ते तीन वर्षात घडलेल्या घटनांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. त्यावर उपाय म्हणून आम्ही ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. गावाच्या परिसरात वाघ, बिबटे, अस्वल या सारख्या आक्रमक प्राण्यांचा परिसरात वावर असल्यास सतर्कतेचा इशारा देणाऱ्या ‘एआय’ तंत्रज्ञानावर मार्व्हलने काम केले. त्याअंतर्गत विशिष्ट ठिकाणांवर उच्च क्षमतेचे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे तंत्रज्ञान ‘बायो अॅक्यूस्टिक्स’ (ध्वनी आधारित) आणि ‘बायो व्हिज्युअल’ (प्रत्यक्ष दृष्य आधारित) अशा दोन प्रकारे काम करते. वाघ किंवा बिबटे परिसरात आल्यास चितळ, सांबर, माकड यासारखे तृणभक्षी प्राणी आणि मोर विशिष्ट प्रकारचे आवाज काढून संपूर्ण परिसराला सतर्क करतात. ते विशिष्ट आवाज टिपून हे ‘एआय’ तंत्रज्ञान डेटाचे विश्लेषण करुन त्यासंबंधीचे सतर्कतेचे इशारे संबंधितांना पाठविण्याचे कार्य करते.

सतर्कतेचे इशारे वन विभागाचे अधिकारी व गावकऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर मिळू शकतात. याशिवाय ‘बायो व्हिज्युअल’ प्रकारच्या तंत्राच्या माध्यमातून कॅमेरात प्रत्यक्ष प्राण्याचे फोटो ‘कॅप्चर’ झाल्यास हे तंत्रज्ञान सतर्कतेचे इशारे पाठवते.

पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी सांगितले की, वन विभागाच्या मदतीने आम्ही वन्यप्राण्याच्या हल्ल्यांच्या दृष्टीने संवेदनशील अशा ४० ठिकाणांची निवड केली असून तेथे प्राधान्याने कॅमेरे लावण्यात आले आहेत. याच आठवड्यात तब्बल तीन ठिकाणी ही यंत्रणा प्रत्यक्षात कार्यान्वितही झाली असून मागील चार दिवसांत दोनदा वाघ आणि बिबट्यांचा वावर असल्याचा सतर्कतेचा इशारा वन विभाग आणि ग्रामस्थांना देण्यात आला आहे. वन विभागाच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश असलेल्या वन्यजीव क्षेत्रासह प्रादेशिक विभागातही खापा व पारशिवनी परिसरात ही यंत्रणा कार्यान्वित होत आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातही ही यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव असून यासंदर्भात वन विभागाचा मार्व्हल संस्थेशी सामजस्य करार झाला असल्याचे नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.