हंसराज भंडारा :- ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) भंडारा जिल्हा कौन्सिलच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे वितरण करून सामूहिक वाचन करण्यात आले.
एआयएसएफचे माजी राज्य सचिव कॉ. प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी दूरध्वनीवरून अश्लील शिवीगाळ करत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. याच वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ दिवंगत नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्याबाबतही अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप एआयएसएफने केला आहे. या घटनेनंतर ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर राज्यभर चर्चा सुरू झाली असून वातावरण तापले आहे. त्याचे पडसाद भंडारा जिल्ह्यातही उमटले.
या पार्श्वभूमीवर एआयएसएफ भंडारा जिल्हा कौन्सिलच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ तसेच कॉ. प्रशांत आंबी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे वितरण करून त्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचे अनोखे आंदोलन करण्यात आल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे.
या आंदोलनात एआयएसएफचे राज्याध्यक्ष वैभव चोपकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. हिवराज उके, एआयएसएफ जिल्हा उपाध्यक्ष प्रणय बडवाई, जिल्हा सहसचिव सुनील कोहळे, कौन्सिल सदस्य जयश्री खांडकुरे, श्रुती तांडेकर, तक्षक डोंगरे, आदित्य वंजारी, अनिल गाढवे यांच्यासह अनेक विद्यार्थी व पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्यांना विचारांनी विचारांना उत्तर देता येत नाही ते अशा प्रकारे शिवीगाळ करून मारण्याच्या धमक्या देतात. पण आता पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही. आम्ही सुद्धा शत्रूला त्याच्याच मार्गाने प्रत्युत्तर देऊ. येत्या 28 एप्रिल रोजी आमदार संजय गायकवाड च्या घरासमोर प्रशांत ला शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वाचन करणार आहोत. गायकवाड काय करतो तेही बघून घेऊ…… वैभव चोपकर, प्रदेश अध्यक्ष, एआयएसएफ महाराष्ट्र

