spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माजी विद्यार्थ्यांच्या उदार हस्ते गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, महात्मा गांधी विद्यालय, सिरोंजी येथे सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम; शिक्षणासाठी दिला मोलाचा आधार

खापा, वार्ताहर :- शिक्षणाच्या वाटचालीत आर्थिक अडचणी अडथळा ठरू नयेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासाने शाळेत यावे, या उदात्त हेतूने महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय, सिरोंजी येथे गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा हृदयस्पर्शी उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रवीण गौरा अशोक बागडे (रा. सर्रा) आणि रविंद्र जिजा विठोबा मडके (रा. टेंभूरडोह) यांनी स्वखर्चाने गणवेश प्रदान करून सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले.

विद्यालयाचे प्राचार्य संदीप भोंडे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या दोन्ही माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले, तर पालकांनीही समाधान व्यक्त करत दातृत्वाचे कौतुक केले.

कार्यक्रमात बोलताना उपस्थितांनी, “माजी विद्यार्थी आपल्या शाळेशी असलेले ऋण अशा समाजोपयोगी उपक्रमातून फेडत आहेत, ही बाब निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे,” असे मत व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो, तसेच समाजात परस्पर सहकार्य आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ होत असल्याचेही नमूद करण्यात आले.

यावेळी महिपाल मडके, प्राचार्य संदीप भोंडे, शिक्षक रामकृष्ण टेकाडे, दीपक नारे, मुरलीधर तवले, प्रा. योगिता बुऱ्हाण, शिक्षिका बॉबी पर्बत, पूजा दहीकर, रेखा रूषिया, शिक्षकेत्तर कर्मचारी मारोती सोमकुवर, शुभम चटकवार, कुंदा बाजनघाटे तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. “विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेली मदत हीच समाजाच्या उज्ज्वल भविष्यातील खरी गुंतवणूक आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सामाजिक जाणीव, शाळेप्रती असलेले प्रेम आणि शिक्षणाविषयीची बांधिलकी यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

Popular Articles