– वृक्षदिंडी, वृक्षारोपणासह विद्यार्थ्यांनी उलगडला गुरु-शिष्य परंपरा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश
खापा, वार्ताहर :- महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सिरोंजी येथे शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच गुरुपौर्णिमेच्या औचित्याने विविध शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांच्या सहभागातून सिरोंजी गावात वृक्षदिंडी काढण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गावातील विविध ठिकाणी तसेच शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. “एक विद्यार्थी–एक वृक्ष” हा संदेश उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारला.
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, वृक्षांचे पर्यावरणीय व सामाजिक योगदान, लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील कार्य आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन व समतेच्या विचारांवर प्रभावी मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य संदीप भोंडे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ज्ञान, संस्कार, पर्यावरण संरक्षण, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम या पंचसूत्रीवर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्तम नागरिक बनून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किसना सहारे यांच्यासह पालक रवी आहाके, राजेंद्र खंडाते, अरुण चटकवार, खलनसिंग खंडाते, जामुत्राव बगमार, नरेंद्र सोमकुवर, पिंकी सोमकुवर तसेच शिक्षक रामकृष्ण टेकाडे, दीपक नारे, तवले, प्रा. योगिता बुरहान, पूजा दहिकर, रेखा ऋषीया, शुभम चटकवार, मारुती सोमकुवर आणि कुंदा बाजनघटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी कुमारी संजना राऊत हिने प्रभावीपणे केले, तर कुमारी रागिनी डाहाट हिने आभार मानले. सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन, गुरुजनांप्रती कृतज्ञता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.





