spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मिहानमधील आयटी कर्मचाऱ्यांची स्मार्ट व शाश्वत प्रवासासाठी ‘आपली बस’ला पसंती

नागपूर :- नागपूरमधील मिहान (MIHAN) परिसर हा वेगाने विकसित होणारा आयटी आणि व्यावसायिक केंद्र बनत आहे. त्यामुळे या परिसरात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि सोयीस्कर सार्वजनिक वाहतूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. ही गरज ओळखून अनेक नामांकित कंपन्यांनी महा मेट्रोशी एकात्मिक असलेल्या ‘आपली बस’ सेवेला आपल्या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी प्राधान्य दिले आहे.

टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, टेक महिंद्रा, स्मार्ट डेटा, केसी ओव्हरसीज एज्युकेशन, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (NCI), एम्स नागपूर, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स (मिहान), मास्टरसॉफ्ट, हल्दीराम, डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड (DRAL), AIESL, INDAMAR, ल्युपिन तसेच इतर अनेक कंपन्यांचे कर्मचारी आपली बस सेवेचा नियमित वापर करत आहेत. महा मेट्रो आणि शहर बस सेवेमधील एकात्मिक सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना सुरक्षित, किफायतशीर, वेळेवर आणि आरामदायी प्रवासाचा लाभ मिळत आहे.

सध्या आपली बस सेवेकडे ७३० बसांचा ताफा असून १२० हून अधिक मुख्य मार्ग आणि २०० पेक्षा अधिक उपमार्गांवर बस सेवा सुरू आहे. ही सेवा नागपूर शहरासह ग्रामीण भागालाही जोडते.

ऑगस्ट २०२६ (आजपर्यंत) या कालावधीत दररोज सरासरी १,७३,१०९ प्रवाशांनी आपली बसचा प्रवास केला आहे. त्यापैकी ६२,५९३ प्रवाशांनी UPI, मोबाईल पास, चलो कार्ड आणि WhatsApp तिकीट सेवा अशा डिजिटल माध्यमांचा वापर करून प्रवास केला आहे.

३ ऑगस्ट २०२६ रोजी आपली बसने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला. त्या दिवशी २,१२,८५६ प्रवाशांनी आपली बस सेवेद्वारे प्रवास करून आजपर्यंतची सर्वाधिक दैनिक प्रवासी संख्या नोंदवली.

शहर बस सेवा, महा मेट्रोशी जोडलेली फीडर सेवा आणि डिजिटल तिकीट प्रणालीमुळे सार्वजनिक वाहतूक ही आता केवळ पर्यायी सेवा न राहता नागपूरमधील नोकरदार, विद्यार्थी आणि नागरिकांची पसंतीची प्रवास व्यवस्था बनत आहे. यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि कॅशलेस होत असून पर्यावरणपूरक वाहतुकीलाही प्रोत्साहन मिळत आहे.

परिवहन समिती अध्यक्षा मंगला खेकरे, मा. आयुक्त  विपीन इटनकर, विशाल कनोजिया (प्रकल्प प्रमुख, चलो मोबिलिटी), सचिन गडबैल (ऑपरेशन्स मॅनेजर, चलो मोबिलिटी), सुमित देशमुख (ऑपरेशन्स मॅनेजर, चलो मोबिलिटी) आणि मयूर कुमारले (मार्केटिंग मॅनेजर, चलो मोबिलिटी) यांच्या मार्गदर्शनाखाली आपली बस सेवा अधिक स्मार्ट, आधुनिक आणि डिजिटल सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहे.

या ऐतिहासिक यशानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार महापौर निता ठाकरे यांचे शुभहस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर लीला हाथीबेड, मा. स्थायी समिती अध्यक्षा  शिवानी दाणी-वाखारे, परिवहन समिती अध्यक्षा मंगला खेकरे, उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक मिलिंद मेश्राम, प्रशासकीय अधिकारी (परिवहन) योगेश लुंगे, राजीव घाटोळे (ऑपरेशन्स मॅनेजर) तसेच गजानन नागुलवार (अॅडमिन मॅनेजर) उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करून त्यांचे अभिनंदन केले. नागपूर महानगरपालिका परिवहन विभाग आणि चलो मोबिलिटी यांच्या संयुक्त प्रयत्नातून नागपूरमध्ये अधिक स्मार्ट, पर्यावरणपूरक आणि डिजिटल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.