spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खाप्यात विज्ञान शाखेसाठी मुंबईत जोरदार पाठपुरावा; शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे सविस्तर निवेदन

– नगराध्यक्ष पीयूष बुरडे यांच्या प्रयत्नांना आमदार डॉ. राजीव पोतदार यांचे मार्गदर्शन; राजेंद्र हायस्कूलमध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेला मान्यता देण्याची मागणी

खापा, वार्ताहर :- खापा शहर व परिसरातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर करण्याच्या दृष्टीने खापा नगर परिषदेद्वारे संचालित राजेंद्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी विज्ञान शाखेला तातडीने मान्यता मिळावी, या मागणीसाठी मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

खापा नगर परिषदेचे नगराध्यक्ष पीयूष बुरडे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच विधानपरिषदेचे आमदार डॉ. राजीव पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी खापा व परिसरातील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेअभावी नागपूरसह इतर शहरांमध्ये शिक्षणासाठी जावे लागत असल्याची वस्तुस्थिती शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले की, विज्ञान शाखा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतो. दैनंदिन प्रवास, वेळेचा अपव्यय आणि इतर शैक्षणिक अडचणींमुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना इच्छित शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येते. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.

राजेंद्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेला मान्यता मिळाल्यास खापा व परिसरातील विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावरच गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कृषी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेला मजबूत शैक्षणिक पाया तयार होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देत या प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली. शासनस्तरावर या विषयाचा सकारात्मक विचार करून लवकर निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असल्याचेही यावेळी नगराध्यक्ष बुरडे यांनी सांगितले.

Popular Articles