spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गडचिरोली शहरात १३ जुलैपासून ‘अमृत आपल्या दारी परिवार सर्वेक्षण २०२६’

– आर्थिकदृष्ट्या दुर्बल खुल्या प्रवर्गातील कुटुंबांच्या गरजा जाणून कल्याणकारी उपक्रमांचे नियोजन; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

गडचिरोली :- अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग (AMRUT) – महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने गडचिरोली शहरात दि. १३ जुलै २०२६ पासून ‘अमृत आपल्या दारी परिवार सर्वेक्षण २०२६’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेऊन त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी उपक्रमांचे नियोजन करण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

हे सर्वेक्षण विशेषतः अशा खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी आहे, ज्यांना महाराष्ट्र शासनाच्या स्वतंत्र विभाग, संस्था किंवा महामंडळांमार्फत विविध योजनांचा लाभ मर्यादित प्रमाणात मिळतो किंवा उपलब्ध होत नाही. अशा कुटुंबांच्या अडचणी, गरजा आणि जीवनमानाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करून भविष्यात त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना आखण्यास या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.

सर्वेक्षणादरम्यान कुटुंबांची शैक्षणिक स्थिती, रोजगार, उत्पन्न, सामाजिक परिस्थिती, कौशल्य विकासाच्या गरजा, शासन योजनांबाबतची माहिती तसेच इतर आवश्यक बाबींची माहिती संकलित करण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम, मार्गदर्शन उपक्रम, रोजगाराभिमुख योजना तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले स्वयंसेवक नागरिकांच्या घरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करतील. नागरिकांनी अचूक माहिती उपलब्ध करून देत सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणातून संकलित करण्यात येणारी माहिती केवळ जनहित आणि समाजहिताच्या उद्देशानेच वापरण्यात येणार असून नागरिकांची वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, अशी ग्वाहीही देण्यात आली आहे.

गडचिरोली शहरातील नागरिकांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देऊन स्वयंसेवकांना आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन विक्रम मोहन पांडे, जिल्हा व्यवस्थापक, गडचिरोली (अमृत) यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.