– मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचा निर्णय
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील २८ सफाई कर्मचारी विनापरवानगी सातत्याने गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली होती. यात ७ ऐवजदार मजुरांचा समावेश होता. या कारवाईनंतर १८ स्थायी सफाई कर्मचारी आणि ३ अधिसंख्य सफाई कर्मचारी अशा एकूण २१ सफाई कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतन वाढ थांबविण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार प्रशासनातर्फे घेतला आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई मजदुरांच्या अनुपस्थितीबाबत तक्रारी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना वारंवार प्राप्त होत होत्या. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार, गेल्या २० ऑक्टोबर रोजी दहाही झोन अंतर्गत प्रभागनिहाय हजेरी स्टँडवरील सफाई मजदुरांच्या हजेरी रजिस्टरची तपासणी करण्यात आली. यापूर्वी २० दिवस व त्यापेक्षा अधिक दिवसापासून गैरहजर असलेल्या २१ सफाई कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
आता कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ७ कर्मचारी ऐवजदार सफाई कर्मचारी असल्यामुळे त्यांना कामावर उपस्थित असल्यास वेतन अदा करण्यात येते. उर्वरीत २१ कर्मचाऱ्यांपैकी १८ कर्मचारी स्थायी सफाई कर्मचारी आणि ३ कर्मचारी अधिसंख्य सफाई कर्मचारी आहेत. तसेच या सफाई कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ थांबविण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या सर्व सफाई कर्मचारी कोणतीही सूचना न देता गैरहजर राहत असल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.








