spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

१४ नोव्हेंबर बाल दिनानिमित्त बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह

हंसराज,भंडारा :- बालकांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित बालपण अबाधित राखण्यासाठी बालमजुरी प्रथा समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने १४ नोव्हेंबर बाल दिनानिमित्त बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह साजरा करण्यात येत असून, बालकांना कामावर ठेवणाऱ्या मालक व नियोक्त्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.

भारतीय राज्यघटनेने बालकांना शिक्षण आणि आरोग्याचे मूलभूत अधिकार दिले आहेत. मात्र, बालमजुरीमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक विकासावर विपरीत परिणाम होतो. बालमजुरी ही सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समस्यांशी निगडित असल्याने या अनिष्ट प्रथेविरुद्ध व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे.

केंद्र शासनाच्या बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ नुसार १४ वर्षांखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय किंवा प्रक्रियेत कामावर ठेवण्यास प्रतिबंध आहे. तसेच १४ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे.

या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मालक किंवा नियोक्त्याला सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा २० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील दुकाने व आस्थापनांचे मालक, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, विटभट्टी मालक तसेच इतर नियोक्त्यांनी बाल अथवा किशोरवयीन कामगारांना कायद्याने प्रतिबंधित कामांवर ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही बालकामगार आढळून आल्यास संबंधितांनी तात्काळ कामगार विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. बालकांचे बालपण सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त यांनी केले आहे.

Popular Articles