spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिल्हा परिषदेची बाजू मांडण्यासाठी स्वतंत्र ‘पीआरओ’ नियुक्त करा

– ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची जिल्हा परिषद सिओ यांना मागणी

हंसराज, भंडारा :- जिल्हा परिषद प्रशासनाच्या विविध विभागांशी संबंधित बातम्यांचे संकलन करताना इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच वृत्तपत्र पत्रकारांना प्रशासनाची अधिकृत बाजू मांडावी लागते. मात्र, अनेकदा जबाबदार अधिकारी उपलब्ध होत नसल्याने किंवा त्यांची बाजू वेळेत न मिळाल्याने बातम्या एकांगी प्रसिद्ध होतात. यामुळे प्रशासनाची नाहक बदनामी टाळण्यासाठी जिल्हा परिषदेत तातडीने जनसंपर्क अधिकारी (PRO) नियुक्त करावा, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर यांनी केली आहे.

या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद साळवे यांना निवेदन देण्यात आले असून, याच्या प्रती जिल्हाधिकारी भंडारा यांनाही माहितीसाठी सादर करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत लोकहिताच्या अनेक योजना राबवल्या जातात, तसेच अनेकदा कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रारीही प्राप्त होतात. अशा संवेदनशील विषयांवर बातमी करताना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना आणि वृत्तपत्र पत्रकारांना वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बाजू मांडणे अत्यंत आवश्यक असते. परंतु, अधिकृत माहिती देणारी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा एकतर्फी बातम्या प्रसारित होतात, ज्याचा फटका जिल्हा प्रशासनाच्या प्रतिमेला बसतो.

इलेक्ट्रॉनिक मीडियाला नियमित विषयांवर व्हिडिओ स्वरूपात माहिती मिळावी आणि वृत्तपत्रांनाही सविस्तर अधिकृत माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी स्वतंत्र ‘पीआरओ’ची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. यामुळे बातमीमध्ये पारदर्शकता येईल आणि जिल्हा प्रशासनाची बाजू जनतेसमोर योग्य रीतीने मांडली जाईल, असे शशिकांत भोयर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून पत्रकारांना बातमी संकलनात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अशी विनंती ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ भंडारा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.

सदर निवेदन देतेवेळी जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी तथा व्हॉइस ऑफ मीडियाचे पत्रकार उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.