– मनपामध्ये वर्क्स मॅनेजमेंट सिस्टमची यशस्वी अंमलबजावणी
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या कामकाजात अधिक पारदर्शकता, सुसूत्रता आणि गतिमानता आणण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या नवीन डिजिटल कार्यपद्धतीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, वर्क्स मॅनेजमेंट सिस्टम या प्रणालीच्या माध्यमातून विविध विकासकामांना मंजुरी देण्यात येत आहे. यामुळे कामांशी संबंधित कागदपत्रे, प्रगतिपथावरील कामांचा मागोवा आणि प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाचा तपशील एकाच व्यासपीठावर उपलब्ध होत आहेत. नागरिकांना जलद सेवा देण्याच्या दृष्टीने ही कार्यपद्धती महत्त्वाची मानली जात आहे. मनपाचे कामकाज अधिकाधिक संगणीकृत करण्याच्या वाटचालीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा मनपाने गाठला आहे.
नागपूर महानगरपालिकेतील विकासकामांशी संबंधित प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ही डिजिटल कार्यपद्धती राबविण्यात येत आहे. याबद्दल महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधीपक्ष नेते संजय महाकाळकर यांच्यासह सर्व गटनेते, पदाधिकारी, नगरसेवक यांना यापूर्वी अवगत करण्यात आले आहे. मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या पुढाकाराने व अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम. यांच्या नियोजनात माहिती व तंत्रज्ञान विभाग संचालक मिलिंद मेश्राम व माहिती व तंत्रज्ञान अधिकारी स्वप्निल लोखंडे यांनी ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. मे. मार्स टेलिकॉम सिस्टीम प्रा.लि. हैदराबाद यांच्याद्वारे ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
या प्रणालीमुळे विकासकामांशी संबंधित प्रस्ताव, कागदपत्रे मंजुरीची प्रक्रिया तसेच कामाची सद्यपरिस्थिती पारदर्शकपणे डिजिटल स्वरूपात उपलब्ध होत आहे. त्यामुळे संबंधित कामाचा आढावा घेणे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना अधिक सुलभ झाले आहे.
याप्रणाली अंतर्गत विकासकामांची टप्प्याटप्प्याने डिजिटल पद्धतीत नोंद केली जात असून, आवश्यक ठिकाणी कार्य प्रगतीचे छायाचित्रे अपलोड केली जात आहे. त्यामुळे काम सुरू होण्याची वेळ, टप्प्या-टप्प्यांवर झालेली प्रगती आणि पूर्णत्त्वाला येण्यापर्यंत लागलेला अवधी याची माहिती उपलब्ध राहणार आहे. विकासकामांच्या प्रक्रियेत होणारा अनावश्यक विलंब टाळण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरत आहे. एखाद्या कामाची फाईल सध्या कोणत्या स्तरावर आहे, मंजुरीची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे किंवा विलंब झाल्यास त्याचे कारण काय आहे, याचा मागोवा डिजिटल माध्यमातून घेता येत आहे. परिणामी विकासकामांच्या अंमलबजावणीत अधिक उत्तरदायित्व निश्चित होण्यास मदत होत आहे. या प्रणालीमुळे डिजिटल कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष कामकाजावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. आगामी काळात महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कामकाज या प्रणालीशी अधिक प्रभावीपणे जोडून प्रशासकीय प्रक्रिया आणखी गतिमान करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.





