– खात रोड रेल्वे ग्राउंड परिसरातील कारवाई; भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
हंसराज, भंडारा :- शहरातील सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्र (कोयता) बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाला भंडारा पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे. ही कारवाई खात रोडवरील रेल्वे ग्राउंड परिसरात करण्यात आली.
अविनाश रेवनाथ नानवटकर (वय २८ वर्षे, रा. राणी लक्ष्मीबाई वार्ड, भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोनपितरे हे आपल्या पथकासह शहरात पेट्रोलिंग (गस्त) घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, खात रोडवरील रेल्वे ग्राउंडवर एक तरुण संशयास्पद स्थितीत शस्त्र घेऊन फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन छापा टाकला.
या कारवाईत आरोपी अविनाश नानवटकर याच्या ताब्यातून लाकडी मूठ असलेला एक धारदार लोखंडी लांबट कोयता जप्त करण्यात आला. हा तरुण सार्वजनिक ठिकाणी कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे शस्त्र बाळगून होता, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. जप्त करण्यात आलेल्या कोयत्याची किंमत अंदाजे ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १११७/२०२६ (कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा, सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनपितरे, पोलीस हवालदार तुमाने व त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भंडारा पोलीस करत आहेत.