spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जमीन बळकावण्यासाठी छळ; भंडारा येथील मध्यमवर्गीय व्यावसायिकाची आत्महत्या

– बड्या व्यावसायिकाच्या मुलाला अटक, वडील फरार; मृतकाच्या मोबाईलमधील ‘व्हिडिओ’ ठरला मुख्य पुरावा

 हंसराज भंडारा :- वडिलोपार्जित जमीन बळकावण्याच्या उद्देशाने शहरातील एका बड्या व्यावसायिकाने दिलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका मध्यमवर्गीय इसमाने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी व्यावसायिकाच्या मुलाला अटक केली असून, मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

रमनसिंग मनमोहनसिंग बाच्छील (वय ४६ वर्षे, रा. सहकार नगर, भंडारा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सन्मय ललित बैस (वय २३ वर्षे) याला अटक केली असून, त्याचे वडील ललित ऊर्फ गुड्डू बैस (रा. खात रोड, भंडारा) यांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमनसिंग बाच्छील यांच्या पूर्वजांच्या जागेच्या मालकी हक्कावरून ललित बैस आणि बाच्छील कुटुंबियांत जुना वाद सुरू होता. ही जमीन बळकावण्यासाठी आरोपी ललित बैस आणि त्याचा मुलगा सन्मय बैस हे रमनसिंग यांना वारंवार धमकावत होते व त्यांचा मानसिक छळ करत होते. या सततच्या त्रासामुळे हताश होऊन रमनसिंग यांनी १५ मे २०२६ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास कुणालाही काहीही न सांगता घर सोडले आणि वैनगंगा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.

मोबाईलमधील व्हिडिओने गुपित उघडले रमनसिंग बेपत्ता झाल्याने शोध सुरू असतानाच, १७ मे रोजी सकाळी वैनगंगा नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला कारधा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, अंत्यविधी पार पडल्यानंतर कुटुंबियांनी रमनसिंग यांचा मोबाईल तपासला असता, त्यात एक खळबळजनक व्हिडिओ आढळून आला. मृत्यूपूर्वी तयार केलेल्या या व्हिडिओमध्ये रमनसिंग यांनी स्पष्टपणे नमूद केले होते की, ललित ऊर्फ गुड्डू बैस आणि सन्मय बैस हे जमीन बळकावण्यासाठी आपल्याला वारंवार धमकावून मानसिक त्रास देत आहेत, आणि याच त्रासाला कंटाळून आपण आपले जीवन संपवत आहोत.

पोलिसांची धडक कारवाई या पुराव्याच्या आधारे मृताच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य आणि आरोपींचा शहरातील दबदबा लक्षात घेता, भंडारा पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवले. १८ मे रोजी रात्री १०:१५ च्या सुमारास पोलिसांनी आरोपी सन्मय बैस याला बेड्या ठोकल्या. मुख्य आरोपी ललित बैस हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या कलमान्वये गुन्हा दाखल आरोपींविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ११२०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०८ आणि ३(५) अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा ठाणेदार उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरकर व तपास पथकाने केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.