यवतमाळ :- “होय! आपण क्षयरोगाला संपवू शकतो या संकल्पनेला अनुसरून जागतिक क्षयरोग दिनानिमित्त यवतमाळ शहरात भव्य जनजागृती रॅली व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथून रॅलीची सुरुवात झाली, जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यक्रम पार पडला.
रॅलीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिचर्या प्रशिक्षणार्थींसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषवाक्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये क्षयरोगाची लक्षणे, उपचार व प्रतिबंधात्मक उपायांविषयी जनजागृती करण्यात आली. रॅलीचा समारोप जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे होते. तर डॉ. क्रांतीकुमार नावंदीकर, डॉ. सागर जाधव, डॉ. नितेश उपाध्याय, डॉ. मनोज तगडपल्लीवार, डॉ. संघर्ष राठोड, डॉ. नाझिया काझी, डॉ. गजानन खरोडे आणि डॉ. हर्षलता गायनार आदी मान्यवर उपस्थित होते.
संतोष धोत्रे यांनी सांगितले की, “क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार असून रुग्णांनी उपचारांचा पूर्ण कोर्स केल्यास ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. समाजातील भीती दूर करून रुग्णांना मानसिक आधार देणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रास्ताविकात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सागर जाधव यांनी क्षयरोग निर्मूलनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते काही क्षयरुग्णांना प्रातिनिधिक स्वरूपात फूड बास्केटचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन कैलास जवंजाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गजानन खरोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.








