spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पेट्रोल पंपांवर रांगा, खापा मध्ये पेट्रोलपंपांवर इंधन भरण्यासाठी तोबा गर्दी, युद्धाची धग गावखेड्यात

खापा, वार्ताहर :- इराण इजराइल अमेरिका यांच्या मध्ये सुरू असलेल्या युद्धाची झडा ग्रामीण भागात पसरल्याचे वातावरण दिसत आहे. याचे फलित म्हणजे मागील दोन दिवसापासून पेट्रोल पंपावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगा लागून प्रचंड गर्दी निर्माण झालेली आहे. या मानवी निर्मित कृत्रिम टंचाईमुळे पेट्रोल पंपावरील डिझेल पेट्रोलचा साठा संपुष्टात आला होता. त्या कारणाने संपूर्ण तालुक्यात अफवा पसरली की अनेक पंपावर इंधन उपलब्ध नाही.

तसेच समाजमाध्यमावर इंधन साठा तुटवड्याची माहिती पसरल्याने अचानक नागरिक पेट्रोल डिझेलसाठी पंपाकडे धाव घेऊ लागले. पंपावरील असलेल्या साठ्यात कुठेतरी कमतरता आली आणि त्यातून जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे इंधनाचा पुरेपूर साठा असूनही, ही नागरिकांनी केलेली मानवनिर्मित टंचाई दिसून येत आहे.

“सामान्य जनजीवन विस्कळीत ?”

शेती, दैनंदिन कामकाज आणि प्रवास यावर याचा मोठा परिणाम होत असून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे. सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेलही मिळेनासे झाले असून युद्धाचा फटका थेट सामान्य माणसाला बसत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

“अफवांवर विश्वास ठेवू नका, साठा पुरेसा”

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचा साठा मुबलक प्रमाणात असून त्याचे प्रशासनामार्फत काटेकोर सनियंत्रण करण्यात येत आहे. तसेच मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध असून कसल्याही प्रकारे पॅनिक होऊ नये. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याला आवश्यक तेवढीच खरेदी करावी, असे आवाहन समाजमाध्यमाद्वारे केले आहे.

प्रतिक्रिया – 

काही समाजमाध्यमावर इंधन साठा तुटवड्याची बातमी पसरल्याने नागरिक घाबरून इंधनाचा साठा करू लागले. त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली. शनिवार, सोमवारी आमच्या येथे पेट्रोल डिझेलचे टँकर उपलब्ध झाले आणि मंगळवार, बुधवारला पण एक टँकर आला आणि गुरुवारला एक टँकर आणखी येणार आहे. डेपोमध्ये मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध असून नागरिकांनी कसल्याही प्रकारे घाबरू नये.

– देवेंद्र तुमाने, मालक, गुरुजी सर्वो, खापा.

इंधनाचा पुरवठा हा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिक पॅनिक झाले. त्यातून अफवा झाल्यामुळे नागरिक इंधनासाठी अचानक एकाच वेळी इंधन खरेदी करून साठा करू लागले. त्यामुळे परिस्थिती विस्कळीत झाली. डेपोकडे गाड्या वगैरे आहेत. ते पण सर्व पेट्रोल पंपावर वाटप करीत आहे. येत्या एक-दोन दिवसात सर्व स्थिती बरोबर होऊन जाईल.

– कुणाल गजभिये, निरीक्षक अधिकारी, सावनेर तालुका.

Popular Articles