हंसराज,भंडारा दिघोरी :- भंडारा जिल्ह्यातील दिघोरी (आमगाव) येथील रहिवासी अभय देवाजी रंगारी यांची भारतीय दलित साहित्य अकादमी, दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘बाबासाहेब डॉ. आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवॉर्ड – २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाल्याने भंडारा जिल्ह्यात आणि साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
भारतीय दलित साहित्य अकादमी ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून दलित साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करत असते. अभय रंगारी यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन अकादमीच्या निवड समितीने त्यांची या गौरवपूर्ण पुरस्कारासाठी निवड केली आहे.
दिल्ली येथे होणार गौरव हा पुरस्कार त्यांना दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या अकादमीच्या ४२ व्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रदान करण्यात येणार आहे. दि. १२ आणि १३ डिसेंबर २०२६ रोजी दिल्ली येथे हा सोहळा संपन्न होईल. अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस. पी. सुमनाक्षर यांनी पत्राद्वारे या निवडीबाबत माहिती दिली आहे.
अभय रंगारी यांच्या या यशामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातून पुढे येऊन राष्ट्रीय स्तरावरील बहुमानासाठी निवड होणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.





