spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बहुजन समाज पार्टीतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

हंसराज, भंडारा :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टी, जिल्हा भंडारा यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. कुकडे नर्सिंग होमसमोर, भंडारा येथे जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक व क्रांतिकारी कार्याला अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी उपस्थित वक्त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे विसाव्या शतकातील भारतातील महान साहित्यिक, शाहिर आणि सामाजिक परिवर्तनाचे योद्धे होते. त्यांनी आपल्या शाहिरी, पोवाडे, कथा, कादंबऱ्या, लावण्या आणि लोकनाट्याच्या माध्यमातून शोषित, पीडित, कष्टकरी आणि वंचित बहुजन समाजाच्या वेदना शब्दबद्ध केल्या. त्यांचे साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून विषमता, अन्याय, जातीय शोषण आणि सामाजिक असमानतेविरुद्धचा प्रभावी आवाज होता. त्यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून स्वाभिमान, समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविला.

यावेळी मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आजच्या काळात अधिक आवश्यकता असल्याचे सांगितले. समाजातील वंचित, दुर्बल आणि कष्टकरी घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांच्या साहित्य आणि कार्यातून मिळते, असे मत व्यक्त करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि संविधानिक मूल्यांचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाला बसपा भंडारा लोकसभा प्रभारी संजय भिवगडे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटघरे, प्रिया सहारे, भंडारा विधानसभा अध्यक्ष नाशिक चवरे, पुरुषोत्तम शहारे, तुळशीराम शेंडे, के. एल. गजभिये, रवींद्र गजभिये, अरविंद नागदेवे, पांबिर्द मोटघरे, रंजीत नंदा गवळी, विक्रांत भवसागर, राहुल साखरे, कुंजन शेंडे, बबन नगरारे, संजय रामटेके, प्रफुल रामटेके, सुनील डोंगरे, रवी गजभिये तसेच बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक चवरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पांबिर्द मोटघरे यांनी मानले. जयंती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.