spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तुमसर येथील ‘प्रभाव लॉज’वर पोलिसांचा छापा; देहव्यापार रॅकेट उद्ध्वस्त, सहा आरोपी गजाआड

हंसराज,तुमसर :- शहरातील अनैतिक व्यवसायांवर आळा घालण्यासाठी तुमसर पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTC) शनिवारी एक मोठी संयुक्त कारवाई केली. तुमसर येथील ‘प्रभाव लॉज’वर सुरू असलेल्या देहव्यापार रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या कारवाईत एका महिला आरोपीसह पाच पुरुष आरोपींना अटक करण्यात आली आहे. या छाप्यात दोन पीडित महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, तुमसर येथील प्रभाव लॉजमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध देहव्यापार आणि मानवी तस्करी सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दि. ०३/०८/२०२६ रोजी तुमसर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने संयुक्तरीत्या या ठिकाणी छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे लॉजमध्ये एकच खळबळ उडाली. तपासणी दरम्यान पोलिसांनी एका महिला आरोपीला आणि पाच पुरुष आरोपींना जाळ्यात ओढले. या कारवाईत पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली असून, त्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सुरक्षितरीत्या त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध ‘अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६’ च्या कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद तुमसर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ८९०/२०२६ नुसार करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सदर धडक कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लांडे, रवींद्र रेवतकर, तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे अर्चना कुथे, मंजुषा घरडे, माणिक किरसान, नेमुताई गाढवे आणि तुमसर पोलीस ठाण्याचे चौधरी व गिरीपुंजे या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. शहरातील अशा प्रकारच्या अनैतिक व बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध यापुढेही कठोर मोहीम राबवण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Popular Articles