– स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी
नागपूर :- स्थानिक बेरोजगार युवक- युवती तसेच अनुसूचित जाती- जमातीतील महिलांना प्राधान्याने रोजगार देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी भीम सेनेच्या वतीने मंगळवारी कोराडी थर्मल पॉवर प्लांटच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलना नंतर भीम सेनेच्या शिष्टमंडळाने कोराडी थर्मल पॉवर प्लांटच्या मुख्य महाव्यवस्थापक (सीजीएम) यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत स्थानिक अनुसूचित जाती- जमातीतील पात्र नागरिकांना आठ दिवसांच्या आत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन सीजीएम यांनी दिल्याची माहिती आंदोलन कर्त्यांनी दिली. भीम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर साळवे यांनी सांगितले की, प्रशासनाने दिलेल्या मुदतीत रोजगार उपलब्ध करून दिला नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आंदोलनात भदंत हर्षबोधी महास्थवीर, भैयाजी खैरकर, शहराध्यक्ष विकास बागुल, जिल्हा उपाध्यक्ष इमरान कुरेशी, पूर्व नागपूर अध्यक्ष कैलाश शेंडे, महिला सचिव ज्योती सोमकुवर, शहर उपाध्यक्ष शालू वासनिक, द्रौपदी प्रधान, शिला बिसेन यांच्यासह भीम सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.




