spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बिहारचा युवक अटकेत; नागपूरात सेक्सटॉर्शन करून व्यापाऱ्याची ५० लाखांची फसवणूक

 

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीचे बनावट प्रोफाइल तयार करून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग; सायबर पोलिसांची कारवाई

नागपूर 27 : नागपूर शहरातून सेक्सटॉर्शनचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका व्यापाऱ्याची तब्बल ४९ लाख ३४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील २० वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, आरोपी फक्त १०वी पास असूनही सायबर गुन्हेगारीत पारंगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.तपासानुसार, जानेवारी २०२५ मध्ये सोनेगाव परिसरातील व्यापाऱ्याशी WhatsApp वरून एका बनावट महिला प्रोफाइलने संपर्क साधला. ती व्यक्ती स्वत:ला दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी असल्याचे सांगत होती.त्यांनी पीडिताशी मैत्री वाढवून अश्लील चॅटिंग आणि फोटो शेअरिंग सुरू केले. काही दिवसांनी त्या प्रोफाइलवरून पीडिताला फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यात आले.लाज आणि बदनामीच्या भीतीने पीडिताने टप्प्याटप्प्याने ४९.३४ लाख रुपये आरोपीच्या खात्यात ट्रान्सफर केले.पीडिताने अखेर सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ४ मे रोजी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. डिजिटल पुरावे, बँक व्यवहार आणि मोबाईल ट्रॅकिंगच्या आधारे आरोपीची ओळख पटली. पूर्णिया (बिहार) येथून सुंदरकुमार कुंदनकुमार सिंह (वय २०) याला अटक करण्यात आली. त्याला नागपूरला आणून सायबर क्राईम विभागाने सखोल चौकशी सुरू केली आहे.पोलीस तपासणीत ही फसवणूक आरोपीने एकट्याने न करता टोळीच्या माध्यमातून केली गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिक आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांचा इशारा

नागपूर सायबर पोलिसांनी नागरिकांना, विशेषतः युवकांना, सतर्कतेचा इशारा दिला आहे.”सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींकडून आलेले मेसेज, व्हिडिओ कॉल, किंवा मैत्रीचे प्रस्ताव यांकडे दुर्लक्ष करा. अश्लील फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणे टाळा.”फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर क्राईम हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.