– सर्वसामान्यांना गॅस मिळेना, तर दुसरीकडे हॉटेल्समध्ये घरगुती गॅसचा सर्रास वापर! जिल्हा पुरवठा विभागाची धडक कारवाई; व्यावसायिकांना दिला कडक इशारा.
हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- भंडारा शहरातील पांढराबोडी रोडवर असलेल्या प्रसिद्ध ‘हॉटेल ग्रीन व्हॅली’मध्ये व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा विभागाने १४ मार्च रोजी अचानक धाड टाकून ही कारवाई केली असून, घटनास्थळावरून घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पुरवठा विभागाचे खरेदी अधिकारी सुहास टॉग, निरीक्षण अधिकारी पोचीराम कापडे आणि त्यांच्या पथकाने १४ मार्च रोजी दुपारी ३:४० वाजता पांढराबोडी रोडवरील ‘ग्रीन व्हॅली’ हॉटेलच्या स्वयंपाकगृहाची (किचनची) अचानक तपासणी केली. यावेळी पथकाला इंडेन कंपनीचा घरगुती वापराचा गॅस सिलिंडर (क्र. ०२७३९१५) एका मोठ्या कमर्शियल शेगडीला जोडून त्यावरून हॉटेलमधील ग्राहकांसाठी जेवण बनविले जात असल्याचे प्रत्यक्ष आढळून आले. पथकाने तत्काळ कारवाई करत सदर सिलिंडर जप्त केले.
घरगुती वापरासाठी मिळणाऱ्या सवलतीच्या गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कामासाठी वापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. याप्रकरणी ‘द लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (रेग्युलेशन ऑफ सप्लाय अँड डिस्ट्रीब्यूशन) ऑर्डर, २०००’ आणि ‘जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५’ मधील कलम ३ व ७ अन्वये हॉटेल मालक प्रणय शेखर साकुरे (रा. शुक्रवारी वॉर्ड, भंडारा) यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया पुरवठा विभागाने सुरू केली आहे.
एकीकडे जिल्ह्यात सर्वसामान्यांना घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत असताना, दुसरीकडे मात्र हॉटेल व्यावसायिक पैशांची बचत करण्यासाठी घरगुती सिलिंडरचा सर्रास गैरवापर करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या कारवाईच्या निमित्ताने जिल्हा पुरवठा विभागाने सर्व व्यावसायिकांना सज्जड इशारा दिला आहे. “हॉटेल, ढाबे किंवा कोणत्याही व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. असा अवैध वापर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. ज्या ठिकाणी असे उल्लंघन आढळेल, त्या व्यावसायिकांवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल,” असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.








