spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘एनपीएस’ नको, ‘यूपीएस’ नको, फक्त जुनी पेन्शनच द्या!

– खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचे संसद भवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन

हंसराज, प्रतिनिधी भंडारा नवी दिल्ली :- देशातील लाखो शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्यासाठी भंडारा–गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. नवी दिल्ली येथील संसद भवनाच्या (लोकसभा) पायऱ्यांवर बसून त्यांनी केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलन केले आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आवाज उठवला.

यावेळी खासदार डॉ. पडोळे यांनी हातात फलक धरून केंद्र सरकारचे लक्ष वेधले. त्यावर “एनपीएस हटवा, यूपीएस हटवा, ओपीएस लागू करा” आणि “एनपीएस नको, यूपीएस नको, फक्त जुनी पेन्शन योजना लागू करा” असे घोषवाक्य लिहून आपला ठाम विरोध दर्शवला. केंद्राने देऊ केलेली नवी पेन्शन योजना (NPS) किंवा युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) कर्मचाऱ्यांच्या हिताची नसून, केवळ जुनी पेन्शन योजनाच त्यांना आर्थिक सुरक्षा देऊ शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आंदोलनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. पडोळे म्हणाले की, “देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणारे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सध्याच्या पेन्शन धोरणामुळे असुरक्षिततेच्या सावटाखाली आहेत. निवृत्तीनंतरचे जीवन सन्मानाने जगण्यासाठी जुनी पेन्शन योजना हाच एकमेव पर्याय आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी खेळू नका, अन्यथा हा लढा अधिक तीव्र होईल.”

खासदार डॉ. पडोळे यांनी संसदेच्या उंबरठ्यावर केलेल्या या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटले आहेत. विविध शासकीय कर्मचारी संघटनांनी या भूमिकेचे स्वागत करत डॉ. पडोळे यांचे आभार मानले आहेत. भंडारा–गोंदिया मतदारसंघातील जनतेचे प्रश्न मांडण्यासोबतच आता त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील कर्मचारी प्रश्नावर घेतलेली ही भूमिका कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे.

केंद्र सरकारने कर्मचारी वर्गाच्या भावनांची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेईपर्यंत आपला हा लढा सुरूच राहील, असा निर्धारही खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी यावेळी व्यक्त केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.