spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वैनगंगेच्या कुशीत रेती तस्करांचा जन्म : अभय कोणाचे?

– सिहोरा परिसरात ‘पांढऱ्या सोन्याची’ दिवसाढवळ्या लूट; स्थानिक प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?

हंसराज,प्रतिनिधी भंडारा सिहोरा :- वैनगंगा नदीच्या पात्रातील पांढऱ्या शुभ्र आणि दाणेदार रेतीला केवळ भंडारा जिल्ह्यातच नव्हे, तर सर्वदूर मोठी मागणी आहे. मात्र, याच मागणीचा फायदा घेत सिहोरा परिसरात रेती तस्करांचे जाळे दिवसेंदिवस घट्ट होत चालले आहे. वैनगंगेच्या कुशीतून ‘पांढऱ्या सोन्याची’ ही लूट नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? रेती तस्करांचा जन्म वैनगंगेच्या कुशीतच झाला की काय? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

तुमसर तालुक्यात हरदोली, नाकाडोंगरी व लेंडेझरी असे तीन वनपरिक्षेत्र तर गोबरवाही, तुमसर व सिहोरा अशी तीन पोलीस स्टेशन आहेत. याशिवाय उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय असतानाही अवैध रेती उपसा जोमाने सुरू आहे. यावरून पोलीस प्रशासन व महसूल विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, यात ‘कुठेतरी पाणी मुरत असल्याचे’ नाकारता येत नाही. सिहोरा परिसरात वाळू माफिया इतके निर्ढावले आहेत की, यामागे काही बडे राजकीय पुढारी तर नाहीत ना, अशी शंकाही आता व्यक्त केली जात आहे.

तुमसर तालुक्यात एकूण १० ते १२ रेती घाट असून, त्यातील काही घाट तर चक्क ‘चोर रेती घाट’ म्हणून कुप्रसिद्ध आहेत. या घाटांवरून दररोज शेकडो ब्रास रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांच्या फिरत्या पथकातील अधिकारी कोणत्या दिशेने येत आहेत, याची पूर्वकल्पना वाळू तस्करांना आधीच मिळते. जिल्हा प्रशासनापेक्षा वाळू तस्करच सध्या अधिक ‘वजनदार’ ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे. भंडारा जिल्ह्यातील इतर तालुक्यांत तस्करांवर कठोर कारवाई होते, मात्र तुमसर तालुक्यातच प्रशासन हतबल का? हा मोठा प्रश्न आहे.

स्थानिक प्रशासन सुस्त असतानाच, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) भंडाराचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बाबाराव पाटील यांनी ८ मार्च रोजी गस्तीवर असताना मोठी कारवाई केली. अवैधरित्या रेती वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर पकडून रेतीसह १६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी छोटू फकीर पटले व विजेश रामदयाल राहांगडाले यांच्यावर सिहोरा पोलीस ठाण्यात गुन्हा (अ.क्र. ९०/२०२४) दाखल करण्यात आला. जर जिल्ह्याचे पथक येऊन कारवाई करू शकते, तर सिहोरा पोलिसांचे पथक या तस्करांना का पकडू शकत नाही? असा सवाल आता उपस्थित होत असून स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Popular Articles