– उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
हंसराज,भंडारा तुमसर :- तुमसर येथील एका उद्योजकाला ग्राडिंग मशीनचे साहित्य पुरवण्याचे आमिष दाखवून ३१ लाख रुपयांनी फसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तुमसर पोलिसांनी मध्य प्रदेशातील कटंगी आणि उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शैलैश खेमचंद जैन (५४, रा. विवेकानंद नगर, तुमसर) यांची तुमसर एमआयडीसी परिसरात ‘आर्या मिनरल्स अँड टेक्नो’ नावाची कंपनी आहे. या कंपनीत मॅगनीज प्रोसेसिंग आणि बॅनेफिकेशनचे काम केले जाते. व्यवसायासाठी जैन यांना त्यांच्या कारखान्यात
‘ग्राडिंग मशीन’ची आवश्यकता होती. ही गरज ओळखून आरोपी विनय कुमार पांडे (रा.पिपरवाणी, ता. कटंगी, जि. बालाघाट, म.प्र.) आणि सतपाल सिंह (रा. शोभा इंजिनीअरिंग वर्क्स, लखनऊ, उ.प्र.) यांनी त्यांना मशीनचे साहित्य देण्याचे आमिष दाखवले.
जून २०२४ पासून ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत, दोन्ही आरोपींनी वेळोवेळी जैन यांच्याकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पैशांची मागणी केली. जैन यांनी साहित्यासाठी एकूण ३१,००,००० (३१ लाख) रुपये दिले. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी मशीनचे साहित्य पुरवले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही साहित्य न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे जैन यांच्या लक्षात आले.
अखेर या प्रकरणी शैलेश जैन यांनी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विनय कुमार पांडे आणि सतपाल सिंह यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(४), ३१६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा (अ.क्र. ५६८/२०२६) नोंद केला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास तुमसर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) साखरे हे करत आहेत. या घटनेमुळे तुमसर औद्योगिक क्षेत्रातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

