– AISF चा केंद्र सरकारवर हल्लाबोल; राज्यस्तरावर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया राबवण्याची मागणी
हंसराज, भंडारा :- “नीट (NEET-UG) २०२६ परीक्षा रद्द होणे, हे या व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि केंद्रीकरणाच्या धोरणाचे अपरिहार्य पतन आहे. ज्या व्यवस्थेला आम्ही सुरुवातीपासून भेदभावपूर्ण आणि भ्रष्ट म्हणत होतो, ती आज पूर्णपणे उघडी पडली आहे. आता केवळ फेरपरीक्षा घेऊन चालणार नाही, तर २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी ही ‘नीट’ परीक्षाच कायमस्वरूपी रद्द करून ‘एनटीए’ (NTA) संस्था बरखास्त करावी,” अशी घणाघाती मागणी AISF चे राज्य अध्यक्ष वैभव चोपकर यांनी केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राजस्थानमधील कोचिंग माफियाने ‘गेस पेपर’च्या नावाखाली १२० प्रश्न जसेच्या तसे विकल्याचा जो प्रकार समोर आला आहे, तो अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही गेल्या दशकभरापासून ज्या सडलेल्या व्यवस्थेविरोधात इशारा देत होतो, त्याचाच हा पुरावा आहे. नीट ही परीक्षा नसून ग्रामीण, गरीब आणि मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी उभारलेली एक जाणीवपूर्वक ‘प्रवेशबंदी यंत्रणा’ बनली आहे.
AISF ने केंद्र सरकारच्या व्यापारीकरण आणि सांप्रदायिकीकरणाच्या धोरणाचा निषेध केला आहे. विशेषतः मुलींना ड्रेस कोड आणि कठोर नियमांच्या नावाखाली दिला जाणारा मानसिक छळ अत्यंत संतापजनक आहे. कोणतीही गुणपत्रिका या मानसिक जखमांची भरपाई करू शकत नाही, असेही चोपकर यांनी नमूद केले. २०२४ मध्ये एकाच केंद्रातील सहा विद्यार्थ्यांना पूर्ण गुण मिळण्यासारख्या विसंगतीकडे आम्ही आधीच लक्ष वेधले होते, मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
– ‘नीट’ कायमस्वरूपी रद्द करा आणि पूर्णपणे बदनाम झालेली ‘एनटीए’ (NTA) संस्थाबरखास्त करा.
– प्रत्येक राज्याला त्यांच्या परिस्थितीनुसार स्वतंत्र वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ठरवण्याचा घटनात्मक अधिकार मिळावा.
– सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण घोटाळ्याची कालमर्यादेत चौकशी करून राजकीय आणि व्यावसायिक लागेबांधे उघड करा.
– शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुन्हेगारीकरण करणे थांबवावे.
“कोणत्याही अर्धवट उपायांना आम्ही मान्यता देणार नाही. जर केंद्र सरकारने या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर AISF संपूर्ण देशात ‘राष्ट्रीय शिक्षण संप’ पुकारेल आणि आंदोलन अधिक तीव्र करेल,” असा इशारा वैभव चोपकर यांनी दिला आहे. नीट रद्द होणे हा विजय नसून शिक्षण व्यवस्था माफियांच्या हाती गेल्याचा हा पुरावा आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.








