spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

झिरो माईल’ विकास प्रकल्पाला केंद्राची साथ; समन्वयासाठी दोन अधिकारी नियुक्त

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई :- नागपूरच्या ऐतिहासिक झिरो माईल स्मारकाच्या विकासासाठी आता केंद्र शासनाचे सहकार्य मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने या प्रकल्पासाठी दोन अधिकारी समन्वयासाठी नेमले आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयातून केंद्र शासनाकडे झिरो माईल स्मारक स्थळाचा सांस्कृतिक वारसा म्हणून विकासासंदर्भात पाठवलेल्या पत्रावर कार्यवाही करत केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव अभय करंदीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या पत्रात करंदीकर यांनी नमूद केले आहे की, नागपूर महानगरपालिका झिरो माईल स्मारकाच्या नूतनीकरण, आधुनिकीकरण आणि विकासाची कामे राबवत आहे. हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून केंद्र सरकार या प्रकल्पासाठी संपूर्ण सहकार्य करेल. यासाठी सर्व्हे ऑफ इंडिया विभागामार्फत दोन अधिकारी समन्वयासाठी नेमण्यात आले आहेत.

अतिरिक्त सर्वेयर जनरल संदीप श्रीवास्तव यांची नोडल अधिकारी म्हणून तर सर्व्हे ऑफ इंडिया, पुणेचे संचालक ए. के. सिंह यांची सहाय्यक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून प्रकल्पाची अंमलबजावणी करतील.

झिरो माईल हे भारताचा भौगोलिक केंद्रबिंदू मानला जातो. या स्मारकाचा विकास केवळ नागपूरच्या ऐतिहासिक ओळखीत भर घालणार नाही, तर शहरातील सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना देणार आहे.

झिरो माईल हे स्मारकाचा विकास हा नागपूरच्या वारशाला नवी दिशा देणारा प्रकल्प ठरणार आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या सहकार्यामुळे हा परिसर जागतिक दर्जाच्या वारसा स्थळाप्रमाणे विकसित होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.