spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नाली सफाईच्या कामात बालमजूर जखमी; कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचा आरोप लाखणी  तालुक्यातील कवडसी येथील प्रकार

हंसराज, भंडारा: लाखणी तालुक्यातील कवडसी येथे नाली सफाईच्या कामावर असलेल्या १५ वर्षीय  बालमजुराच्या पायावर सिमेंटची फरशी पडल्याने त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने  जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, दुर्गेश मधुसूदन सार्वे हा १० व्या वर्गात शिकणारा मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीत कवडसी येथे आपल्या आजी-आजोबांकडे राहत होता. मे महिन्यात ग्रामपंचायत सदस्य आणि कंत्राटदार यांनी त्याला नाली सफाईच्या कामावर नेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ मे ते २४ मे २०२६ या काळात दुर्गेशकडून नाली सफाईचे काम करून घेण्यात आले. २४ मे रोजी कामावर असताना जड सिमेंटची फरशी उचलताना ती दुर्गेशच्या पायावर पडली, ज्यामुळे त्याच्या पायाच्या अंगठ्याला गंभीर इजा झाली.

घटनेनंतर कंत्राटदार आणि इतर काही लोकांनी त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथे प्राथमिक उपचार करून ही बाब कोणालाही न सांगण्याबाबत दबाव टाकण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, जखम अधिक बिघडल्याने त्याला प्रथम भंडारा आणि नंतर नागपूर येथील रुग्णालयात हलवावे लागले. संसर्ग वाढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दुर्गेशच्या पायाचा अंगठा शस्त्रक्रियेद्वारे कापून टाकावा लागला.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, या अपघातामुळे दुर्गेशला कायमस्वरूपी अपंगत्व आले असूनत्याच्या कुटुंबीयांना सुमारे ५० हजार रुपयांचा वैद्यकीय खर्च सोसावा लागला आहे.

कंत्राटदाराने बालमजुरी प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करून अल्पवयीन मुलांना कामावर ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच, घटनेची माहिती लपवण्यासाठी आर्थिक आमिष दाखवल्याचा आणि योग्य उपचार न केल्याचा आरोप कंत्राटदार राजकुमार खंडाईत, सरपंच मनीषा खंडाईत, ग्रामसेवक प्रदीप चेटुले आणि डॉक्टर हजारे यांच्यावर करण्यात आला आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन बालहक्क संरक्षण कायदा, बालमजुरी प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष असित बागडे यांनी केली आहे. या संदर्भातील  निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक, महिला व बालविकास अधिकारी आणि कामगार आयुक्त यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. सध्या प्रशासन या तक्रारीची चौकशी करत असून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.